सरसंघचालकांशी काय बोलणार गडकरी? आज एकाच व्यासपीठावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळा 
सत्तेबाबत काय बोलणार याकडे लक्ष 
सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व नितीन गडकरी यांची आज भेट 

नागपूर ः राज्यात दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षातून मार्ग निघत नाही आहे. मात्र, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज, गुरुवारी (ता. 7) एका व्यासपीठावर येत आहेत. 24 ऑक्‍टोबरला विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले. मात्र, कुण्याही एका पक्षाला मतदारांनी स्पष्ट बहूमत दिले नसल्याने आणि चारही प्रमुख पक्षांच्या आमदारांची संख्या बहूमतापर्यंत पोहचली नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात सुरू असलेला सत्ता स्थापनेच्या कोंडीवर ते आपल्या भाषणातून काय संकेत देतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. 

जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळा आणि जिव्हाळा (आठवणी विलासजींच्या) पुस्तक प्रकाशन गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात आयोजित केला आहे. पुस्तकाचे प्रकाशनाला सरसंघचालक व नितीन गडकरी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष पाहुणे म्हणून डॉ. विलास डांगरे आणि भदन्त डॉ. मेत्तानंद चिंचाल उपस्थित राहणार आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री सरसंघचालकांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोघांनीही मुख्यमंत्र्यांना नितीन गडकरी यांची भेट घेण्याचा सल्ला दिला होता. गडकरी यांनी राज्यातील भाजप आणि शिवसेना यांच्यात समेट घडवून आणावा, अशी मागणी होत आहे. मात्र, गडकरी यांनी अद्याप याबाबत कुठलेही भाष्य केलेले नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सरसंघचालक आणि गडकरी एकत्र येत असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. 

मुख्यमंत्रीपदासाठी गडकरींची "निती" 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सर्व पक्षात असलेले सलोख्याचे संबंध पाहता, राज्यातील सत्ताकोंडीवर ते काय संकेत देतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी असलेल्या संबंधातून नवीन सत्ता समिकरणासाठी कोणती निती ते अवलंबनार आहेत, हे ही स्पष्ट होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What will Gadkari talk to RSS?