हिंगोली : गावातील समस्या सोडविण्यासाठी व्हॉट्सअॅपचा आधार

हिंगोली : गावातील समस्या सोडविण्यासाठी व्हॉट्सअॅपचा आधार

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात टंचाई परिस्‍थितीवर मात करण्यासोबतच गावातील प्रश्नांच्या सोडणुकीसाठी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी व्हॉटस्‌अॅपचा फंडा सुरु केला आहे. व्हॉटस्‌अपवर आलेल्या तक्रारींच्या नोंदी घेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. या उपक्रमामुळे लाखो गावकऱ्यांशी व्हॉटस्‌अॅपच्या माध्यमातून संवादही साधला जाणार आहे. 

हिंगोली लोकसभा मतदारसंघात तीव्र दुष्काळी परिस्‍थिती असून गावकऱ्यांचे पाण्यावाचून हाल होवू लागले आहे. प्रशासनाकडून टँकर व इतर उपाय योजना केल्‍या असल्‍या तरी या उपाय योजना मात्र अनेक ठिकाणी तोकड्या पडू लागल्‍या आहेत. दुर्गम भागात सकाळपासूनच महिला व लहान मुले पाण्याच्‍या शोधात भटकंती करत असल्‍याचे चित्र आहे. 

दरम्‍यान, जिल्‍ह्‍यातील टंचाई उपाययोजना तातडीने हाती घेऊन गावकऱ्यांना दिलासा मिळावा. तसेच जलयुक्त शिवार अभियानातून केली जाणारी कामे, रोहित्र मिळण्याच्या अडचणी दूर करण्यासाठी  खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. एकाचवेळी सर्व गावांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न सोडविणे शक्य नसल्यामुळे खासदार पाटील यांनी व्हॉटस्‌अॅपचा फंडा हाती घेतला आहे. यामध्ये लोकसभा मतदार संघातील गावकऱ्यांनी व्‍हॉटसअॅप (क्र. ७२७६०९३००१) माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे. संदेश पाठवणाऱ्या व्यक्‍तींनी त्‍यांचे पूर्ण नाव, तालुका, भ्रमणध्वनी क्रमांक, संबंधित गावातील ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पाठवणे आवश्यक आहे.

याशिवाय टंचाईमुक्तीसाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, रोहित्र मिळण्याच्या अडचणी, रस्त्यांचे प्रश्न यासह गावातील अडचणींची माहिती व्‍हॉटसअॅपवर थोडक्‍यात द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. खासदार पाटील यांच्‍या या निर्णयामुळे गावापातळीवरील प्रश्न  मार्गी लागणार असल्याचे बोलले जात आहे. 

गावकऱ्यांतून अपेक्षांचा पाऊस

खासदार पाटील यांच्या या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी (ता.३१) गावकऱ्यांतून अपेक्षांचा पाऊसच पडला आहे. काही भागात जलयुक्तची कामे योग्य झाली नाही तर कुठे टंचाई उपाय योजनेची  कामे झाली नाही.

काही ठिकाणी पुलाचे बांधकाम करणे गरजेचे असून, हे प्रश्न सोडविण्याची अपेक्षा उटी, बोथा (ता.महागाव), कोंढूर (ता.कळमनुरी), नागझरी, येळी (ता.औंढा), सावंगी (ता.वसमत) करंजी, तरोडा (ता.उमरखेड), पळसपुर (ता.हिमायतनगर) आदी गावातील गावकऱ्यांनी व्हॅटस्‌अपद्वारे व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com