नालेसफाईला "खो' दिल्याने पांढरी वेस नाला ओव्हरफ्लो

file photo
file photo

अंजनगावसुर्जीः दोन तास बरसलेल्या पावसाने शहरातील सांडपाणी वाहून नेणारा नाला ओव्हरफ्लो झाल्याचा प्रकार घडला. नाल्याकाठावरील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले. यानिमित्ताने नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीची पोलखोल झाली आहे. 
यावर्षी पावसाळ्यापूर्व नगरपालिकेने नाल्याची सफाई केली नसल्याने व पालिकेच्या कार्यालयालगत राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या बांधकामामुळे पाणी अडल्याने हा प्रकार घडला असल्याचे बोलले जाते. या घटनेने पालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पडले असून नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.


शहराच्या पूर्व भागाकडून नागरिकांच्या सांडपाण्याचा शहानूर नदीपात्रात निचरा करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला पांढरी वेस नाला गुरुवारी (ता.10) दुपारी सुमारे दोन तास बरसलेल्या पावसाने गुलजारपुरा,पानअटाई भागात ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे नाल्याकाठावरील बहुतांश लोकांच्या घरांतून पाण्याने वाट काढली. त्यामुळे शेतमाल, गृहपयोगी वस्तू व घरांचे मोठे नुकसान झाले. भूतकाळातही असे प्रकार बरेचदा घडले असताना नगरपालिकेच्या वतीने या नालासफाईकडे लक्ष दिले जात नाही. संपूर्ण नाला गाळाने भरला असून त्यावर मोठ्या प्रमाणात वनस्पती वाढली आहे. पावसापूर्वी नियोजनात या नाल्याची व्यवस्थित सफाई करणे आवश्‍यक असताना पालिकेच्या वतीने दरवर्षी थातूरमातूर सफाईचे काम केले जाते. यावर्षी तर नाल्याची सफाई केल्याच गेली नाही. शिवाय पालिका कार्यालयाजवळच राष्ट्रीय महामार्गाचे या नाल्यावर पूल बांधणीचे काम सुरू असल्याने पाणी वाहण्याला ब्रेक बसला. याकारणाने केवळ दोन तासांच्या पावसात नाला अनेक ठिकाणी ओव्हरफ्लो झाला. गुलजारपुरा भागात तर नाल्याकाठावर रहिवाशी असलेल्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय बाजूला असलेल्या लक्ष्मी मंगलकार्यालयाच्या बेसमेंटमध्ये पाणी साचून तलाव निर्माण झाला होता. त्यांचे सर्व साहित्य पाण्याने खराब होऊन मोठे नुकसान झाले. बाजूला असलेल्या श्री. इखार या शेतकऱ्याच्या घरात पाणी शिरल्याने पानपिंपरी शेतमालाचे पोते पाण्याने भिजले. 

अधिकारी, पदाधिकाऱ्यांची पाठ
सर्वत्र हाहाकार पसरला असतानाही एकही अधिकारी व पदाधिकारी याठिकाणी आले नाहीत. नितीन आवंडकर यांनी त्यांच्या जेसीबीच्या साहाय्याने पानअटाईकडील उताराच्या भागात नाल्याच्या काठावर चर तयार करून पाण्याला वाट करून दिली. तेव्हा लोकांच्या घरातील पाणी येणे बंद झाले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com