गडकरींच्या विरोधात सेनेचा उमेदवार कोण? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

नागपूर - शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा लढण्याची कोणाची हिंमत नसल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे यांनी नागपूरचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांनी विचारला. मात्र, एकानेही तयारी दाखविली नाही. यामुळे ठाकरे यांनी उमेदवार आयात करण्याचा इशारा दिल्याचे समजते. 

नागपूर - शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा लढण्याची कोणाची हिंमत नसल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे यांनी नागपूरचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांनी विचारला. मात्र, एकानेही तयारी दाखविली नाही. यामुळे ठाकरे यांनी उमेदवार आयात करण्याचा इशारा दिल्याचे समजते. 

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्वबळाच्या चाचपणीसाठी नागपूरमध्ये विदर्भातील सर्व दहा लोकसभा मतदारसंघांच्या प्रमुख पदाधिकऱ्यांची बैठक घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी युतीचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचे जाहीर करून स्वबळावर निवडणूक लढण्याचा इरादाही व्यक्त केला. त्यामुळे साहजिकच नागपूरमधून भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात कोण लढणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. उद्धव यांनी लोकसभा लढण्याची कोणाची इच्छा आहे, अशी विचारणाही केली. एरवी विधानसभेपासून तर महापालिकेच्या उमेदवारीसाठी थेट मुंबई गाठणाऱ्या आणि मातोश्रीवर पायपीट करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एकानेही लढण्याची हिंमत दाखविली नाही. पदाधिकाऱ्यांनी साधलेल्या चुप्पीवरून उद्धव ठाकरे काय समाजयाचे ते समजले असेल. मात्र, येथून कोणाला लढवायचे, असा पेचही त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. 

नागपूरच्या मतदारांनी आजवर जातीय समीकरणे पाळलेले नाही. अनेक वर्षे अल्पसंख्याक असलेल्या विलास मुत्तेमवार यांना निवडून दिले. मागील निवडणुकीत नितीन गडकरी यांना तब्बल पावणेतीन लाखांच्या फरकाने निवडून देऊन लोकसभेत पाठवले. यामुळे उमेदवार निवडताना शिवसेना कशाचा आधार घेतात, हे बघावे लागेल. आज गडकरी यांच्याविरोधात लढण्यास कॉंग्रेसकडेसुद्धा सक्षम उमेदवार नाही. शिवसेनेचा जिल्ह्यात एकही आमदार नाही. महापालिकेत फक्त दोन नगरसेवक आहेत. सर्वांना चालेल असा दमदार नेता नाही. शेखर सावबांधे यांच्या धरसोड निर्णयामुळे त्यांचे राजकीय करिअर डामाडोल झाले आहे. ते शिवसेनेत परतले असले तरी सक्रिय झालेले नाहीत. विद्यमान जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांचा शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त संपर्क आहे. अंतर्गत मतभेद, गटबाजीने शिवसेना पोखरून गेली आहे. अनेक निष्ठावंत घरी बसले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांनी कितीही जोश भरला तरी शिवसेनेचा फुगा फुगण्याची कुठलीच शक्‍यता दिसत नाही.

Web Title: Who is the candidate against Gadkari