विजयाचा गुलाल कोण उधळणार? 

file photo
file photo

नागपूर  : पालकमंत्र्यांचे तिकीट कापलेला कामठी-मौदा मतदारसंघ तसेच कॉंग्रेसचे दिग्गज नेते सावनेरचे आमदार सुनील केदार, काटोलचे माजी मंत्री अनिल देशमुख तसेच रामटेकमधील बंडखोरी यांसह ग्रामीणमधील सर्व सहा लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उद्या गुरुवारी येथील सर्व दिग्गजांचे भाग्य ईव्हीएममधून बाहेर पडणार आहे. 
भाजपने सर्व सहा जागा जिंकण्याचा संकल्प केला. मात्र, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेच तिकीट कापण्यात आल्याने जिल्ह्यात असंतोष आहे. माजी मंत्री अनिल देशमुख पुन्हा संपूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून, त्यांची लढत भाजपचे चरणसिंग ठाकूर यांच्याशी झाली. सुनील केदार यांना कुठल्याही परिस्थिती पराभूत करायचेच असा चंगच बांधलेल्या भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा घेऊन मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सावनेरच्या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. 
रामटेकमध्ये शिवसेनेकडून हॅटट्रिक साधणारे व यावेळचे बंडखोर आशीष जयस्वाल यांच्यासह भाजपमधून आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हिंगण्याचे उमेदवार विजय घोडमारे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे. उमरेडमधून सुधीर पारवे यांना तिसऱ्यांदा, रामटेकमधून डी. मल्लिकाजुन रेड्डी यांच्यासमोर दुसऱ्यांदा जागा कायम ठेवण्याचे आव्हान आहे. सावनेरमधून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, कामठीमधून कॉंग्रेसचे सुरेश भोयर, भाजपचे टेकचंद सावरकर, काटोलमधून चरणसिंग ठाकूर, रामटेकमधून उदयसिंग यादव यापैकी कोण प्रथमच विधानसभेच्या पायऱ्या चढणार हे निश्‍चित होणार आहे. 
यंदा कॉंग्रेसने अनेक धाडसी प्रयोग केले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना उमेदवारी नाकारून तुलनेत राजकारणात नवखे असलेले उदयसिंग यादव यांना मैदानात उतरवले. कामठीतसुद्धा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांना उमेदवारी दिली. येथे पालकमंत्र्यांचे कट्टर समर्थक टेकचंद सावरकर यांना अंतिम क्षणी रिंगणात उतरवले. बावनकुळे यांची उमेदवारी कापल्याने जनतेत रोष असल्याने येथे धक्कादायक निकालाची अपेक्षा आहे. भाजपचे समीर मेघे यांच्याविरुद्ध भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले विजय घोडमारे यांच्यात लढत होणार आहे. 
उमरेड मतदारसंघात पारवे बंधू यांच्यात लढत आहे. भाजपचे सुधीर पारवे यांच्याविरुद्ध त्यांचे चुलतबंधू राजू पारवे यांचे भाग्य पणाला लागले आहे. राजू पारवे यांच्यासाठी राजेंद्र मुळक यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. रामटेकमध्ये तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले असून, येथून भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी, कॉंग्रेसचे उदयसिंग यादव व शिवसेनेचे बंडखोर आशीष जयस्वाल यांच्यात सामना असून प्रहारचे रमेश कारेमोरे यांनी रंगत आणली आहे.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com