महावितरणने घेतला कोणाचा धसका? बायोमेट्रिक केली बंद

बाळू जीवने
सोमवार, 9 मार्च 2020

जगभरातील अनेक देशांनी सध्या कोरोना व्हायरसचा चांगलाच धसका घेतला आहे. महावितरण कंपनीने याची खबरदारी घेत राज्यातील कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी पुढील कालावधीकरिता बंद केली आहे. आता अधिकारी व कर्मचारी जुन्या पद्धतीप्रमाणे हजेरी पुस्तकात स्वाक्षरी करणार आहेत.

वरोरा (जि. चंद्रपूर) : बायोमेट्रिक हजेरी पद्धतीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे कार्यलयात वेळेवर येणे सुरू झाले. या इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांची हजेरी संगणीकृत करणेही सोयीचे झाले आहे. राज्यातील सर्वत्र कार्यालयांमध्ये, शाळा व महाविद्यालयातसुद्धा बायोमेट्रिक उपकरणावर कर्मचारी आपल्या बोटाचा ठसा उमटून हजर असल्याची नोंद करतात.

ही हजेरी थेट वेतनाशी जोडलेली असते. यामध्ये कार्यालयात आल्यावर व कार्यालयाची वेळ संपल्यानंतर बोटाचा ठसा बायोमेट्रिक मशीनवर लावावा लागतो.

विषाणू चिकटण्याची शक्‍यता

या मशीनला एका दिवसात दोनदा स्पर्श करावा लागतो. यामध्ये अनेक कर्मचारी स्पर्श करीत असल्याने कोरोना या आजाराचे विषाणू त्याला चिकटण्याची शक्‍यता लक्षात घेऊन महावितरण कंपनीने एक परिपत्रक काढले आहे. त्यात कोरोना व्हायरसवर प्रतिबंधक उपाय म्हणून पुढील आदेशापावेतो कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक उपस्थिती नोंद करू नये, तर हजेरी पत्रकात नोंद करावी, असेही नमूद करण्यात आले.

मुख्य व्यवस्थापकांनी काढले परिपत्रक

हे परित्रक महावितरण कंपनीचे मुख्य व्यवस्थापक शिवाजी इटलकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. महाराष्ट्रातील शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय आणि खासगी क्षेत्रातही बायोमेट्रिक हजेरीचा वापर केला जातो. या सर्व ठिकाणी महावितरणसारखे परिपत्रक निघेल, याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : खवय्यांच्या ताटातून कोंबडी पळाली; तंगडी काही मिळेना!

तातडीने अंमलबजावणी

महावितरण कंपनीचे मुख्य व्यवस्थापक शिवाजी इटलकर यांच्या स्वाक्षरीने काही दिवसांपूर्वीच हे परिपत्रक काढण्यात आले आहे. परिपत्रक निघताच महावितरण कंपनीच्या सर्व कार्यालयांत याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्वच अधिकारी, कर्मचारी आता हजेरी पुस्तकात स्वाक्षरी करणार आहेत. या सोयीने लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच फावणार असल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Whose threat was taken by Mahavitaran?