निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आसोलामेंढा तलावाची शतकपूर्ती....पण पर्यटनस्थळाचा दर्जा नाही

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 June 2020

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यात ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प, घोडाझरी तलाव, सोमनाथ, माणिकगड किल्ला, आनंदवन यांचा समावेश आहे. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आसोलामेंढा तलावाला भेट देऊन पर्यटक समाधानी होतात. या तलावाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी फार जुनी आहे.

पाथरी (जि. चंद्रपूर) : सिंचनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण केलेल्या आसोलामेंढा तलावाला आज 103 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2017 रोजी या तलावाने 100 वर्षे पूर्ण केली होती. या तलावाचा शतकपूर्ती महोत्सव साजरा होईल, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या तलावाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी फार जुनी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

 

ब्रिटिशांनी हा तलाव सिंचनाच्या सोयीसाठी बांधला होता. या तलावाने स्वतःच्या सौंदर्याने पर्यटकांची मने जिंकली. येथे कोणत्याही प्रकारच्या सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले नाही; तरीही पर्यटकांची येथे गर्दी असते. गडबडीच्या व्यस्त जीवनात, धक्काबुकीच्या जीवनात कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात थोडा वेळ काढून मनःशांती लाभावी, असे प्रत्येकाला वाटते.

 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यात ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प, घोडाझरी तलाव, सोमनाथ, माणिकगड किल्ला, आनंदवन यांचा समावेश आहे. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आसोलामेंढा तलावाला भेट देऊन पर्यटक समाधानी होतात. या तलावाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी फार जुनी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा

तलाव तुडुंब भरल्यानंतर वाहणारा धबधबा येणाऱ्या पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. सांडव्यावरून वाहणारे खळखळणारे पाण्याचे दृश्‍य पर्यटकांचे मन हेलावून टाकणारे आहे. या तलावाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला; तर हे विदर्भातील प्रमुख पर्यट स्थळ म्हणून जनतेच्या पसंतीस उतरेल. आता या आसोलामेंढा तलावाला 103 वर्ष पूर्ण झाले. मात्र, कोणत्याही लोकप्रतिनिधीने या तलावाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही.

पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा

सावली, मूल आणि पोंभुर्णा तालुक्‍यांतील शेतकऱ्यांसाठी हा तलाव वरदान आहे. मागीलवर्षी आमदार आणि आताचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या तलावाला भेट दिली. या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आपण दहा कोटींची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा तलाव तुडुंब भरलेला आहे. या दिवसांत पर्यटक मोठी गर्दी करतात. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आसोलामेंढा तलाव पर्यटनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

जाणून घ्या : सरकारचा ग्राम पंचायतींवर मर्जीतील व्यक्तीच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

विकास झाल्यास रोजगाराची संधी

आसोलामेंढा तलावाचा परिसर निसर्गरम्य आहे. या भागाचा पर्यटनस्थळाच्या धरतीवर विकास झाल्यास रोजगाराची संधी अनेकांना मिळू शकतो. त्यासाठी राज्य शासनाने लक्ष देणे आवश्‍यक आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आसोलामेंढा तलावाचा पर्यटनस्थळाच्या धरतीवर विकास करावा, अशी अपेक्षा सावलीकरांची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Asolamendha Lake has been neglected