esakal | चोरी करायला आला अन्‌ खून का केला?
sakal

बोलून बातमी शोधा

chakoo

त्याने ३० जूनला घरात प्रवेश केला. यावेळी चोरी करण्याऐवजी लंकाबाईच्या डोक्‍यात दगडी  पाटा, विटांनी मारहाण करून ठार केले.

चोरी करायला आला अन्‌ खून का केला?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरपना (जि. चंद्रपूर) : वृद्ध महिलेच्या घरात चोरी करण्याच्या इराद्याने प्रवेश केला. मात्र,  चोरी न करता महिलेचा खून करून पसार झाला. दोन-तीन दिवसांनंतर घटना उघडकीस  आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत खून करणाऱ्यास अटक केली. ही घटना  गडचांदुरातील जिल्हा परिषदेजवळील वॉर्ड क्रमांक चारमध्ये घडली.

लंकाबाई निळकंठ  मेश्राम (वय ६०) असे मृत वृद्ध महिलेचे, तर अब्दुल खलिल अब्दुल रशीद शेख (वय २२)  असे खून करणाऱ्या चोरट्याचे नाव आहे. गडचांदूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळील वॉर्ड क्रमांक चारमध्ये लंकाबाई निळकंठ  मेश्राम ही महिला एकटीच राहत होती. तिचा पती निळकंठ मेश्राम (वय ७२) हे सेवानिवृत्त  वनरक्षक असून, ते वेगळे राहतात.

घरी एकटीच वृद्ध महिला असल्याचे बघून त्याच  वॉर्डातील अब्दुल खलिल अब्दुल रशीद शेख याने चोरी करण्याचा निर्णय केला. त्यानुसार,  त्याने ३० जूनला घरात प्रवेश केला. यावेळी चोरी करण्याऐवजी लंकाबाईच्या डोक्‍यात दगडी  पाटा, विटांनी मारहाण करून ठार केले. घटनेनंतर त्याने पळ काढला.

दोन दिवसांपासून लंकाबाई घराबाहेर दिसत नसल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर  घरातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे गडचांदूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.  पोलिसांनी घटनास्थळ गाठून घरात बघितले असता, लंकाबाई रक्ताच्या थारोळ्यात  मृतावस्थेत पडून होती.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.  डोक्‍याला जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाजात स्पष्ट झाले. त्यानंतर  पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या  मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गोपाल भारती यांनी तपास सुरू केला.

असं घडलंच कसं : शिल्पग्राम प्रशिक्षण केंद्र दोन वर्षापासून कुलूपबंद! वाचा काय आहे कारण
 

खुन्याच्या अटकेतील पथके गठित केली. त्यानंतर संशयित म्हणून त्याच वॉर्डातील अब्दुल  खलिल अब्दुल रशीद शेख याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान  त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अवघ्या चोवीस तासांत गुन्हेगारास अटक केल्याने पोलिसांचे  अभिनंदन केले जात आहे.

चोरी करायला आला अन्‌ खून का केला, हा सर्वांना प्रश्‍न पडला  आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे, पोलिस उपनिरीक्षक चौधरी,  शुभांगी ढगे, धर्मराज मुंडे, जगदीश झाडे, रोहित चिटगिरे यांच्या पथकाने केली.