मुख्यमंत्र्यांनी दिलेली नोकरी गेली; शेतकरी‌‌ विधवा मागतेय इच्छामरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

2015 मध्ये आत्महत्या करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेती व शेतकऱ्यांच्या वेदना मांडणारे वाशीम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे शेतकरी दत्ता लांडगे यांच्या विधवेने इच्छा मरणाची परवानगी मागितल्याने, एकच खळबळ उडाली.  

मालेगाव (जि.वाशीम) : 2015 मध्ये आत्महत्या करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेती व शेतकऱ्यांच्या वेदना मांडणारे वाशीम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे शेतकरी दत्ता लांडगे यांच्या विधवेने इच्छा मरणाची परवानगी मागितल्याने, एकच खळबळ उडाली.  

लांडगे यांच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांच्या पत्नीस मानधन तत्त्वावर मदतनीस म्हणून दरमहा सात हजाराची दिलेली नोकरी प्रशासनाने काढून घेतली असून, दोन चिल्या-पिल्यांसह जगण्याची धडपड असह्य झाल्याने सोनाली लांडगे या महिलेने प्रशासनाकडे इच्छामरणाची मागणी केली आहे.

जऊळका (रेल्वे) येथील शेतकरी दत्ता आत्माराम लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून ता. 10 सप्टेंबर 2015 ला आत्महत्या केली होती. या पत्रात त्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने त्यांच्या विधवा पत्नी सोनाली लांडगे यांना जिल्हाधिकारी वाशीम यांनी मदतनीस पदावर ता. 20 सप्टेंबर 2015 ला नेमणूक दिली होती. त्यांना दरमहा मिळणारे 7 हजार रुपये मानधन, त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या उपजीविकेचे साधन होते. असे असताना 11 जून 2018 ला त्यांना सेवेतून कमी केले. 

त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार अमित झनक यांच्याकडे निवेदन देऊन सेवेत सामावून घेण्याची विनंती केली. परंतु, आजपर्यंत त्यांना सेवेत सामावून घेतले नाही. त्यामुळे त्यांनी सेवेत सामावून घ्या; अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Widow Farmer Asking for Self Death