घरी सोडून देण्याचा बहाणा करून केला घात... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

शनिवार, 11 जानेवारीचा तो दिवस. कळंब तालुक्‍यातील उमरगाव येथील एक विधवा महिला शेतात कामासाठी गेली होती. दिवसभर शेतात काम करून सायंकाळच्या सुमारास ती गावाकडे परतली.

यवतमाळ : शेतातून घराकडे पायी जात असलेल्या एका विधवा महिलेला मोटारसायकलवर घरी पोहोचवून देतो, असा बहाणा करून दोन तरुणांनी तिच्यावर रस्त्यात लैंगिक अत्याचार केला. ही घटना नुकतीच बेलोरी ते उमरगाव रस्त्यावर घडली. वडगाव जंगल पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे. 

शनिवारची ती सायंकाळ...

शनिवार, 11 जानेवारीचा तो दिवस. कळंब तालुक्‍यातील उमरगाव येथील एक विधवा महिला शेतात कामासाठी गेली होती. दिवसभर शेतात काम करून सायंकाळच्या सुमारास ती गावाकडे परतली. रस्त्याने पायी जात असताना त्याच रस्त्यावरून उमरगाव येथील मंगलदास रेवडे आणि विकास मेश्राम हे दोन तरुण मोटारसायकलने गावाकडे जात होते. महिलेला रस्त्याने एकटे जाताना बघितले आणि या दोघांच्या सैतानी डोक्‍यात वेगळेच भूत शिरले. मंगलदासने मोटारसायकल थांबवून दुचाकीने तुला घरी सोडून देतो, असे म्हटले. गावातीलच तरुण असल्याने तिने त्या लबाडांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवला. ती त्या दोघांसोबत मोटारसायकलवर बसली. 

मंगलदासने घेतला अंधाराचा फायदा

मोटारसायकल गावाच्या दिशेने धावू लागली. परंतु या दोघांच्या डोक्‍यात काही वेगळेच होते. तोपर्यंत अंधारल्यासारखे झाले होते. काही अंतर जात नाही तोच मंगलदासने रस्त्याच्या बाजूला मोटारसायकल थांबविली. त्याने महिलेचा हात पकडून रस्त्याच्या बाजूला नेले आणि अंधाराचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

हेही वाचा- पाच लाखांचे डाळींब वाटेतच फुर्रर्र... 

विकासनेही साधली संधी 

विकास हादेखील संधीच्या शोधात होता. मी तुझ्यासोबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येतो, असे म्हणत मदतीचा बहाणा केला. त्यानंतर त्यानेही रस्त्याच्या बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराला बळी पडलेल्या त्या विधवेने दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी वडगाव जंगल पोलिस ठाण्यात जाऊन आपल्यावर मंगलदास रेवडे आणि विकास मेश्राम यांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी मंगलदास व विकास यांच्याविरुद्घ गुन्हा नोंदविला. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A widow woman raped by two youths