पत्नी दारू पिऊन सतत करायची भांडण, अखेर पतीने उचलले असे पाऊल... 

संतोष तापकिरे
Saturday, 1 August 2020

वर्तमानपत्रांमध्ये सतत वाचायला मिळणाऱ्या घटनांच्या अगदी विरुद्ध अशी ही घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात असलेल्या केशरपूर गावात नुकतीच घडली. गोरेलाल राजू बेठेकर (वय 48, रा. केशरपूर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

अमरावती : दारू पिऊन पतीने पत्नीचा छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या बऱ्याच घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु खुद्द पत्नी दारूच्या आहारी जाऊन पतीसोबत नेहमी भांडत होती. त्याला त्रास देत होती. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पतीने एकेदिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

वर्तमानपत्रांमध्ये सतत वाचायला मिळणाऱ्या घटनांच्या अगदी विरुद्ध अशी ही घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात असलेल्या केशरपूर गावात नुकतीच घडली. गोरेलाल राजू बेठेकर (वय 48, रा. केशरपूर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीविरुद्ध धारणी ठाण्यात गुरुवारी (ता. 30) गुन्हा दाखल झाला. आत्महत्येपूर्वी गोरेलाल यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. त्यात पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद होते, असे धारणी पोलिसांनी सांगितले. 

अवश्य वाचा- अखेर बडनेऱ्याच्या विकृत लॅब टेक्निशियनची कारागृहात रवानगी

गोरेलाल बेठेकर यांची दोन्ही मुले शाम (वय 19) व सूरज (वय 25, दोघेही रा. केशरपूर) यांचेही पोलिसांनी बयाण नोंदविले. त्यांनी पोलिसांना दिलेल्या बयाणानुसार, आई म्हणजेच गोरेलालची पत्नी ही नेहमी दारू पिऊन वडिलांसोबत भांडण करीत होती. तिच्या सततच्या अशा वागण्यामुळे वडील त्रस्त झाले होते.

अवश्य वाचा- माझ्याकडे लग्नाचा पुरावा आहे, तुझे लग्न दुसऱ्यासोबत होऊ देणार नाही, असे म्हणत केला अत्याचार...

आईच्या त्रासामुळेच वडिलांनी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. धारणी पोलिसांनी मृत्यूपुर्व चिठ्ठी आणि दोन्ही मुलांच्या बयाणाच्या आधारे गोरेलाल बेठेकर याच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन : राजेंद्र मारोटकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife constantly quarrel over alcohol, One day husband committed suicide