प्रियकराच्या मदतीने प्राध्यापक पतीचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Deshmukh

वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने प्राध्यापक असलेल्या पतीचा गळा आवळून खून केला.

प्रियकराच्या मदतीने प्राध्यापक पतीचा खून

दिग्रस (जि. यवतमाळ) - वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने प्राध्यापक असलेल्या पतीचा गळा आवळून खून केला. ही घटना तालुक्यातील सिंगद येथील पुलाखाली सोमवारी (ता. १) उघडकीस आली. शवविच्छेदनाच्या अहवालात खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दिग्रस पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रा. सचिन देशमुख असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह गेल्या सोमवारी पुलाखाली आढळून आला होता. शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अहवालात काही बाबींवर संशय आल्याने सचिनचे चुलत भाऊ हर्षद नागोराव देशमुख यांनी घातपात झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.

त्यात वनरक्षक असलेल्या पत्नी व तिच्या प्रियकराचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी दिली. पुलाखाली सोमवारी (ता. १) सायंकाळी आढळून आलेल्या मृतदेहाच्या नावावर सचिन नाव गोंदलेले दिसले. त्यावरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हा मृतदेह उमरखेड येथील प्राध्यापक सचिन वसंतराव देशमुख यांचा असल्याचे उघडकीस आले. सचिन हा त्याच्या पत्नीकडे अकोट येथे गेला होता. त्यानंतर अचानक त्याचा मृतदेह सिंगद येथे पुलाखाली आढळून आला. म्हणून पोलिसांना संशय आल्याने त्यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. त्यानंतर आलेल्या वैद्यकीय अहवालात संशयित बाबी आढळून आल्याने दिग्रस पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

अकोट येथून पत्नीला भेटून निघाल्यानंतर सचिनचा मृतदेह सिंगद येथे कसा आला, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते.

पोलिसांनी अधिक खोलवर तपास केला तेव्हा अनैतिक संबंधातून हा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर, ठाणेदार धर्मा सोनुने यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाचे परदेसी, सायबर टीम व उमरखेड येथील पोलिस निरीक्षक माळवे व त्यांचे सहकारी यांनी सखोल चौकशी केली. या प्राथमिक चौकशीत मृताची पत्नी व तिचा प्रियकर शिवम चंदन बछले यांच्या सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सचिनची पत्नी ही अकोट येथे वनरक्षक होती. तिचा प्रियकर शिवम चंदन बछले परतवाडा येथे वनरक्षक होता, तर पती सचिन देशमुख (रा. उमरखेड) हा प्राध्यापक होता. याबाबतचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Wife Murder Of Professors Husband With The Help Of Lover Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..