लोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून

अनिल कांबळे
बुधवार, 16 जानेवारी 2019

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जरीपटक्‍यातील गुरूनानक फार्मसी कॉलेजजवळ घडली. पत्नीच्या हत्याकांडात पती घनशम हरीराम गुहीरे (वय 50) असे आरोपी पतीचे नाव आहे.

नागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जरीपटक्‍यातील गुरूनानक फार्मसी कॉलेजजवळ घडली. पत्नीच्या हत्याकांडात पती घनशम हरीराम गुहीरे (वय 50) असे आरोपी पतीचे नाव आहे.

घनश्‍याम हा सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. त्याची पत्नी लक्ष्मी ही हातमजुरीचे काम करते. पत्नीचे बाहेर कुणाशीतरी अनैतिक संबंध आहेत असा संशय घनश्‍यामला होता. त्यावरून त्यांच्यात मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच कारणावरून सोमवारी रात्री वाद झाला होता. रात्री उशिरापर्यंत त्यांचा हा वाद सुरू होता. त्यानंतर रात्री दोन वाजताच्या सुमारास लक्ष्मी झोपी गेली.

मंगळवारी सकाळी 5.45 च्या सुमारास लक्ष्मी झोपेत असताना घनश्‍यामने लोखंडी तव्याने तिच्या डोक्‍यावर वार केला. डोक्‍यावर वार बसताच लक्ष्मी किंचाळली. त्यामुळे तिचा मुलगा मनदीप यास जाग आली. त्याने खोलीत जाऊन पाहिले असता त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. लगेच तिला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेची माहिती जरीपटका पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उपचारादरम्यान लक्ष्मी हिचा आज बुधवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून आरोपी पती घनश्‍याम गुहीरे यास अटक केली.

Web Title: Wife murder through suspicion of immoral relations