आमची सत्ता आली की सरसंघचालकांना तुरुंगात टाकणार : आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

केंद्र सरकार अर्थव्यवस्था मोडकळीस आणत आहे. रिझर्व्ह बॅंकेला इतिहासजमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळेच उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला

 

नागपूर : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कायद्याला मानत नाही. सरसंघचालक मोहन भागवत खुलेआम 'एके-47'सारख्या शस्त्रांची पूजा करतात. आमचे सरकार आले, की भागवतांना तुरुंगात पाठवू', असे खळबळजनक वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी काल (गुरुवार) केले. 'कॉंग्रेससोबत गेलो, तरीही एमआयएमला सोडणार नाही', असेही त्यांनी स्पष्ट केले. 

वंचित बहुजन आघाडीच्या अधिवेशनामध्ये आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले. या भाषणामध्ये आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. 'केंद्र सरकार अर्थव्यवस्था मोडकळीस आणत आहे. रिझर्व्ह बॅंकेला इतिहासजमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळेच उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला', असा आरोप त्यांनी केला. आगामी निवडणुकीमध्ये भाजपला दोन आकड्यांवर आणू, असा दावाही आंबेडकर यांनी केला. 

'अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 12 वर्षांची शिक्षा आहे. सरसंघचालक भागवत खुलेआम शस्त्रांची पूजा करतात. आमची सत्ता आल्यानंतर त्यांना तुरुंगातच टाकू', असे विधान आंबेडकर यांनी केले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटामध्ये अडकविण्याचा चुकीचा खेळ मोहन भागवत यांनी सुरू केला. आता या खेळाचा शेवट आता मीच करणार', असा इशाराही आंबेडकर यांनी दिला. 

ठाकरे मतलबी परिवार  - पठाण 
भाजपसोबत सत्ता उपभोगायची आणि त्यांच्यावर टीका करायची अशी शिवसेनेची दुटप्पी भूमिका  आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला गेले आणि परत आले. राज ठाकरे यांची मनसे विझणारा दिवा आहे. आपले राजकारण टिकवण्यासाठी ओवेसी यांच्यावर टीका करतात. केवळ शहरांची नावे बदला, याला ठोका त्याला ठोका अशी मागणी करणारा ठाकरे परिवार मतलबी असल्याचा आरोप यावेळी वारीस पठाण यांनी केला.

आरक्षण मर्यादा ७० टक्के करा
मराठा आरक्षणाचे स्वागत आहे. मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्यासाठी राज्याची आरक्षण मर्यादा ७० टक्के केली पाहिजे.  तसा कायदा संसदेत करणे आवश्‍यक आहे. मात्र, हे सरकार करणार नाही. आरक्षणाच्या नावाने हे सरकार समाजासमाजात दंगल घडविण्याच्या प्रयत्नात आहे.

Web Title: Will arrest Mohan Bhagwat when we will get into the power, says Prakash Ambedkar