Bhandara Hospital Fire: चौकशीसाठी समिती गठीत करून ३ दिवसांत अहवाल सादर करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे 

टीम ई सकाळ 
Saturday, 9 January 2021

भंडारा जिल्हा रुग्णालयाला आज दुपारी भेट दिल्यानंतर टोपे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम उपस्थित होते. 

भंडारा : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसांत अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भंडारा जिल्हा रुग्णालयाला आज दुपारी भेट दिल्यानंतर टोपे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम उपस्थित होते. 

नक्की वाचा - अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घराचं शेजाऱ्यांनी उघडलं दार; पलंगाजवळील दृश्य बघून भल्याभल्यांचा उडाला थरकाप

आरोग्यमंत्री टोपे यांनी जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या वॉर्डची आज पाहणी केली. यावेळी आगीचे नेमके कारण, रुग्णालयातील अग्निप्रतिबंधक यंत्रणा आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट तसेच रुग्णालयात स्फोट होण्याची नेमकी कारणे, आदींबाबत चौकशी करून समिती शासनाला अहवाल सादर करेल. यासाठी संबंधित तज्ज्ञांचा समावेश समितीत केल्याची माहिती त्यांनी दिली. 

भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ही समिती गठीत केली आहे. घटनेशी संबंधित सर्व संबंधितांची तसेच प्रत्यक्षदर्शींचीही समितीसोबतच पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. बेफिकीरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या आपत्तीत तातडीने मदतकार्य करून इतर बालकांचा जीव वाचविणाऱ्या परिचारिका आणि वार्डबॉयचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यावेळी उपस्थित होते. पाहणीनंतर आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं 

बालकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन 

भोजापूर येथील गीता विश्‍वनाथ बेहरे यांचे बाळ या घटनेत दगावले आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विश्‍वजीत कदम उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will make committee regarding Bhandara district Hospital Fire said Rajesh Tope