पारदर्शक कारभाराने अपेक्षा पूर्ण करणार - नंदा जिचकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

नागपूर - पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी विश्‍वास टाकून दिलेल्या या संधीचे सोने करीन. पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित महापौर नंदा जिचकार यांनी आज दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिलेल्या विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करीत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनपाच्या हिरवळीवर सोमवारी आयोजित पदग्रहण सोहळ्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माजी महापौर प्रवीण दटके, भाजप शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रा. अनिल सोले, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, माजी उपमहापौर सतीश होले, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, माजी महिला महापौर सर्वश्री अर्चना डेहनकर, वसुंधरा मासूरकर, पुष्पा घोडे, माया इवनाते, कल्पना पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांमध्ये प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याची उपजत शक्ती असते, असे नमूद करीत महापौर म्हणाल्या, मनपा सभागृहात एकूण पक्षाच्या 61 नगरसेविका आहेत. पुढील पाच वर्षांत या सर्व महिला नगरसेविका उत्कृष्ट आणि पारदर्शक काम करून स्वतःचा ठसा उमटवतील. घटनेने दिलेल्या संधीचे सोने करून दाखवू, असेही त्यांनी नमूद केले. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनीही पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आमदार सुधाकर कोहळे यांनी जिचकार यांच्या नेतृत्वात हे शहर आणखी जास्त पारदर्शकतेने कार्य करून जनतेचा विश्‍वास संपादन करेल, असा विश्‍वास व्यक्त केला. माजी महापौर प्रवीण दटके यांनी सत्तेची मशाल आता नवनिर्वाचित महापौर नंदा जिचकार यांच्या हातात सुपूर्द करीत असल्याचे सांगितले. यापुढेही नंदा जिचकार यांच्या नेतृत्वात विकासकामे करीत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. संचालन नगरसेविका दिव्या धुरडे यांनी केले. आभार सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी मानले.

Web Title: Will meet the expectations of transparent management