आणीबाणीतील 72 बंदीवासांना मानधन देणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

यवतमाळ : आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसलेल्या व्यक्तींना शासनाने मानधन सुरू केले आहे. जिल्ह्यात असे 72 बंदिवास असून, त्यांना मानधन सुरू करण्यात आले आहे.

यवतमाळ : आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसलेल्या व्यक्तींना शासनाने मानधन सुरू केले आहे. जिल्ह्यात असे 72 बंदिवास असून, त्यांना मानधन सुरू करण्यात आले आहे.
आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येणार आहे. 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीसाठी लढा दिलेल्या व्यक्तींना एक महिन्यापेक्षा जास्त किंवा एक महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी कारावास सोसावा लागला, अशा व्यक्ती व त्यांच्या पती, पत्नीस मानधन देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार व त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार रुपये, तर त्यांच्या पश्‍चात त्याच्या पत्नीस, पतीस अडीच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात असे 72 व्यक्ती आहे. त्यामध्ये एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेले 67 व्यक्ती असून, त्यापैकी 26 व्यक्तींचे निधन झाले आहे. त्यांच्या वारसाला पाच हजार रुपये मानधन देण्यात येत आहे.
एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेले पाच व्यक्ती असून, एका व्यक्तीचे निधन झाले आहे. चार व्यक्तींना पाच हजार, तर वारसाला अडीच हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्रस्ताव दाखल केलेल्या 18 व्यक्तींना मानधन सुरू झाले असून, दुसऱ्या टप्प्यातील 54 व्यक्तींसाठी 82 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. लवकरच त्यांना मानधन सुरू करण्यात येणार आहे.
पाच व्यक्ती अपात्र
प्रस्ताव दाखल केलेल्यांपैकी पाच जणांना अपात्र ठरविण्यात आले आहे. पती किंवा पत्नीलाच वारस केल्याने एका मुलाने व एका आईने दाखल केलेला प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आला. वारस नसलेल्या दोघांचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती मूळचा बुलडाणा येथील असल्याने त्यांचा प्रस्ताव तेथे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will pay tribute to 72 emergency detainees