एका गावात दारूबंदी म्हणून दुसऱ्या गावात पोहोचतात छंदी; मुक्तिपथकडे तब्बल १०० त्रासदायक गावांची यादी

मिलिंद उमरे
Sunday, 20 September 2020

गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूबंदी आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यातही दारूबंदी झाली आहे. पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नसताना गडचिरोलीचे अनेक तळीराम वैनगंगा नदी पार करून चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड येथे जाऊन आपली हौस भागवून घ्यायचे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस विभागासह सर्च संस्थेचे मुक्तिपथ अभियानही कठोर परिश्रम घेत आहे. पण एक गाव दारूबंदीसाठी सज्ज होताच दारूचे छंदी दुसऱ्या गावात आपला छंद पुरवायला जातात. त्यामुळे या कार्यात अनेक अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील अशा जवळपास १०० त्रासदायक गावांची यादीच मुक्तिपथने तयार केली आहे.

हेही वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन

गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूबंदी आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यातही दारूबंदी झाली आहे. पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नसताना गडचिरोलीचे अनेक तळीराम वैनगंगा नदी पार करून चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड येथे जाऊन आपली हौस भागवून घ्यायचे. विशेष म्हणजे गडचिरोलीतीलच काहीजणांनी या तळीरामांची सोय करण्यासाठी गडचिरोलीची हद्द संपताच चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर सुसज्ज मदिरालये (वाइन बार) थाटले होते. चंद्रपूरमुळे गडचिरोलीची दारूबंदी कमजोर ठरत होती. 

आता चंद्रपुरातही दारूबंदी असली, तरी दोन्ही जिल्ह्यांत दारूतस्करी व अवैध विक्री सुरूच आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने नागरिकांना दारूपासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती, अहिंसक कृती, गरज पडल्यास पोलिसांच्या मदतीने अवैध दारूविक्रेत्यांच्या घरी छापे असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. शिवाय व्यसनांच्या आहारी गेलेल्यांसाठी उपचार शिबिरे व दवाखान्यांचेही आयोजन करण्यात येते. 

इतर गावांमध्ये जाऊन ढोसतात दारू 

ग्रामस्थांना कळकळीने समजावून सांगितल्यावर अनेक गावे आपल्या गावात दारूबंदी प्रभावी करण्यासाठी सक्रिय होतात. पण, अशा आठ-दहा गावांत ग्रामस्थांनी दारूविक्रेत्यांची उचलबांगडी करताच जवळचेच एखादे हट्टी गाव दारूनिर्मिती, तस्करी व विक्री सुरूच ठेवते. त्यामुळे दारूबंदीसाठी कटिबद्ध गावातील मद्यप्रेमी या गावांमध्ये जाऊन दारू ढोसतात. अनेकदा समाजावून सांगून, छापे मारून, गुन्हे दाखल करूनही काही गावे सुधारायचे नाव घेत नाहीत. परिणामी जिथे ग्रामस्थ मेहनतीने दारू हद्दपार करतात त्या गावांतील नागरिकांचा हिरमोड होतो. म्हणून अशा हट्टी आणि त्रासदायक गावांवर कारवाईची गरज आहे.

‘बी’ वर्गाची श्रेणी

मुक्तिपथने दारूबंदीसंदर्भातील प्रभावाच्या आधारे गावांचे विविध गटात वर्गीकरण केले आहे. जी गावे दारूबंदी झुगारून दारूनिर्मिती व विक्री सुरूच ठेवतात, अजिबात जुमानत नाहीत, अशा गावांना "बी' वर्गाची श्रेणी देण्यात आली आहे. या ‘बी’ चा अर्थ ‘बदमाश’ असा आहे. या बदमाश गावांवर अंकुश ठेवल्यास दारूबंदी अधिक प्रभावी होईल, असा विश्‍वास मुक्तिपथला आहे.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

आम्ही जेव्हा एखाद्या गावात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करतो तेव्हा त्या गावापासून प्रेरणा घेऊन इतरही गावे आपल्या गावात दारू निर्मिती किंवा विक्री होऊ देत नाहीत. पण, काही गावे ऐकायलाच तयार नसतात. गडचिरोलीसारख्या शहरातही असे काही परिसर आहेतच. खरेतर जिथे प्रभावी दारूबंदी आहे, अशा आठ-दहा गावांनी या नियम मोडणाऱ्या गावावर दबाव आणायला हवा. तसेच पोलिस विभागाने लगेच कारवाई करायला हवी. तेव्हा जिल्ह्यातील दारूबंदी अधिक प्रभावी होऊ शकेल.
- डॉ. मयूर गुप्ता, 
संचालक, मुक्तिपथ, गडचिरोली 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wine seekers are goes to another village foe wine