गुगलमॅपकडे नाही तो मार्ग आहे दारूविकेत्यांकडे, वाचा कशी होते तस्करी

daru
daru

वणी (जि. यवतमाळ) : दारूसाठी वाट्टेल ते, अशी सिथती दारू प्रेमींची आणि दारू विक्रेत्यांचीही आहे. दारूविक्रेत्यांनी दारूसाठी  चक्क गुगल मॅपवर नसलेला मार्गच शोधून काढला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्‍यात पोहोचविण्यात येणाऱ्या देशी दारूच्या वाहनाची चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत बेलोरा फाट्यावर झडती घेण्यात आली. वाहतूक परवान्यावरील मार्गच संशयास्पद आढळून आला. त्यामुळे शिरपूर पोलिसही आश्‍चर्यचकित झालेत. उमरेडला पोहोचण्यासाठी शॉर्टकट असताना चंद्रपूर जिल्ह्यातून जात अंतर का वाढविण्यात आले, याची चर्चा होत आहे.

यवतमाळ येथील राजू वाइन एजन्सी यांनी (एम.एच. 40 बी.जी. 8749) या वाहनात रॉकेट संत्रा या कंपनीच्या 250 पेट्या देशी दारू नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्‍यात असलेल्या वायगाव, घोटुरली येथे पोहोचविण्यासाठी वाहतूक परवाना गुरुवारी (ता.चार) दुपारी बारा वाजता निर्गमित केला. त्या परवान्याची मुदत शुक्रवार (ता. पाच) सायंकाळी पाचपर्यंत होती. परंतु त्या वाहतूक परवान्यावर दर्शविण्यात आलेला मार्ग प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकणारा होता. यवतमाळ ते उमरेड हे अंतर केवळ 160 ते 165 किलोमीटरचे आहे. त्यासाठी यवतमाळ, कळंब, वर्धा, बुटीबोरी, उमरेड असे जाता येते किंवा यवतमाळ, कळंब, देवळी, वर्धा, समुद्रपूर ते उमरेड असा मार्ग आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरून यवतमाळ, करंजी, वडकी, वडनेर, जाम ते उमरेड हा जवळचा वाहतुकीस योग्य मार्ग आहे. मात्र, दारूबंदी असलेल्या व मोठ्या प्रमाणात तस्करीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेकडून दूरचे अंतर पार करीत वाहतूक परवान्यानुसार यवतमाळ, वणी, बेलोरा फाटा, निलजई ते उमरेड असे तब्बल 235 किलोमीटरचे मार्गक्रमण का करण्यात आले, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यानंतर सीमावर्ती भागातून दारु तस्करीला उधाण आले आहे. विविध फंडे अवलंबत अवैध दारूचा पुरवठा केल्या जातो. त्याच प्रमाणे लगतच्या तेलंगण, यवतमाळ, नागपूर येथूनही मद्यपींची तलफ भागविण्यासाठी लिकर लॉबी सरसावल्याची बाब लपून राहिलेली नाही. अधिकृत वाहतूक परवानाद्वारे दारूची तस्करी तर होत नाही, ना अशी चर्चा रंगायला लागली आहे.

वाहतूक परवाना कोणत्या आधारे
उमरेडकडे परवानाधारक वाहन चंद्रपूर मार्गाने जात असल्याचे लक्षात आले. ते वाहन बेलोरा येथे करण्यात आलेल्या नाकेबंदीमध्ये थांबविण्यात येऊन तपासणी करण्यात आली. वाहतूक परवाना यवतमाळ, वणी मार्गे चंद्रपूर ते उमरेड असा देण्यात आला होता. या बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पत्र पाठवून या मार्गाने दारू वाहतूक परवाना कोणत्या आधारे देण्यात आला. याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
अनिल राऊत
ठाणेदार, पोलिस ठाणे, शिरपूर.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com