
दारूतस्करांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर नागरिकांनी गडचांदूर-आवारपूर रस्ता सुमारे साडेतीन तास रोखून धरला. त्यामुळे आवारपूर ते बिबी गावापर्यंत वाहनांची रिघ लागली होती.
आवारपूर (जि. चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे चिकन मटन मार्केट परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात वॉर्डातील महिलांनी 29 जानेवारीला हल्लाबोल करून दारू पकडून दिली. या प्रकाराचा वचपा घेण्यासाठी 7 ते 8 दारूतस्करांनी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष रितिका ढवस यांच्या घरावर हल्ला केला.
या हल्ल्यात रितिका ढवस, विजय ढवस, शोभा ढवस हे जखमी झालेत. ढवस कुटुंबीयांच्या मदतीसाठी आलेले जिल्हा परिषद सदस्य शिवचंद काळे आणि त्यांचा मुलगा सोनू काळे यांनाही दारूतस्करांनी मारहाण केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या नागरिकांनी गडचांदूर-वणी मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. हल्ला करणाऱ्या लखन बावणे (वय 35), सुनील बावणे (वय 60), सदाशिव पारधी (वय 49), कैलास पारधी (वय 25), प्रदीप बावणे (वय 33) यांच्यासह अन्य तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - 'पत्नीकडे पैशांची मागणी करणे म्हणजे छळवणूक नाही'; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...
दारूतस्करांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर नागरिकांनी गडचांदूर-आवारपूर रस्ता सुमारे साडेतीन तास रोखून धरला. त्यामुळे आवारपूर ते बिबी गावापर्यंत वाहनांची रिघ लागली होती. दरम्यान, पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, दारूविक्री, सट्टापट्टी कायमची बंद करण्याचे आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे प्रशासनासमोर चांगलाच पेच निर्माण झाला होता.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलिस निरीक्षक गोपाल भारती यांनी दाखल होऊन आंदोलनकर्त्या नागरिकांशी चर्चा केली आणि अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
राज्य शासनाकडून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. मात्र, दारू पकडून दिल्यामुळे दारूविक्रेत्यांकडून घरावर हल्ले केल जात आहेत. अशा घटनांमुळे दारूविक्रेत्यांविरुद्ध भविष्यात महिला आवाजच उठविणार नसल्याचे रितिका ढवस यांनी सांगितले. तर, नांदाफाटा येथे अवैध व्यवसाय चालू देणार नसल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नायक यांनी सांगितले.
संपादन - अथर्व महांकाळ