औरंगाबादमधील दारूतस्करीचा यवतमाळात पर्दाफाश; ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Daru
Daru

यवतमाळ : औरंगाबादमध्ये निर्माण होणाऱ्या दारूची बंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यांत दारूतस्करी होणार होती. मात्र, या तस्करीचा यवतमाळात पर्दाफाश झाला. पोलिसांनी एकूण ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यवतमाळ शहर पोलिसांनी रेडिको एनव्ही डिस्टिलरीज महा. लिमिटेड कंपनीचे मालक, एनसीसी लॉजिस्टिक नाशिकचे मालक अमन चौधरी, ट्रक मालक गोकुल वाखुरे (रा. औरंगाबाद), चालक योगेश लघाने यांच्यासह अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

शुक्रवारी (ता.१८) रात्री यवतमाळ शहर पोलिस ठाण्याचे पथक पेट्रोलिंगवर असताना धामणगाव मार्गावरील नारिंगेनगर येथे एक ट्रक उभा असल्याची माहिती मिळाली. लगेच पथकाने घटनास्थळ गाठले. पोलिस दिसताच दोघांनी ट्रकच्या केबिनमधून उतरून पळ काढला. ट्रकमधून दारूसारखा आंबट व उग्र वास येत असल्याने पोलिसांना अवैध दारूतस्करीचा संशय आला.

रात्रीच्या वेळी वाहन रस्त्यावर उभे ठेवणे शक्‍य नसल्याने क्रेनच्या सहाय्याने शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. ठाणेदार धनंजय सायरे यांनी प्राथमिक चौकशी करून पंचांसमक्ष पाहणी केली. त्यात विविध विदेशी दारूचा शासनाच्या मूल्यदरानुसार एकूण ३६ लाख ८५ हजार ७६१ रुपयांचा मद्यसाठा होता. वाहनाची किंमत दहा लाख रुपये असा एकूण ४६ लाख ८५ हजार ७६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक के. ए. धरणे, एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धनंजय सायरे, रवी आडे, राजकुमार कांबळे, अमित कदम, प्रवीण उईके, अंकुश फेंडर, अन्सार बेग आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 


‘एक्‍साईज’चा मार्गच बदलला

एक्‍साईजच्या (राज्य उत्पादन शुल्क विभाग) अधिकाऱ्यांनी वाहतूक परवान्यासाठी औरंगाबाद- जालना- नांदेड असा मार्ग दिला होता. मात्र, वर्धा अथवा चंद्रपूर या जिल्ह्यांत दारू नेण्यासाठी चक्क मार्गच बदलण्यात आला. सदर ट्रक हा धामणगाव मार्गावर बंदस्थितीत आढळून आल्याने तस्करीचा हेतू फसला.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com