esakal | मुलीला जन्म दिल्यानंतर मातेचा मृत्यू, डॉक्टरांची चूक असल्याचा कुटुंबीयांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

arvi

मुलीला जन्म दिल्यानंतर मातेचा मृत्यू, डॉक्टरांची चूक असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आर्वी (जि. वर्धा) : नऊ महिने पोटात वाढविले. प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यात आणि खासगी रुग्णालयात दाखल केले. शेवटी गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, त्या मुलीला आपल्या आईचा चेहराही पाहता आला नाही. कारण जन्म देताच मातेने जग सोडले. डॉक्टरांच्या चुकीमुळे महिलेचा जीव गेल्याचा आरोप तिच्या परिवाराने केला. तसेच आर्वी पोलिसांत (Arvi police wardha) तक्रार दाखल केली असून परिसरात संतापजनक वातावरण आहे.

हेही वाचा: VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

रोहिणी उर्फ गौरी अभीजित डवरे (२८ वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. तिला बुधवारी येथील राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल केले होते. बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कालिंदी राणे यांनी तिची तपासणी करून शुक्रवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास सिझेरियन करून बाळंतपण केले. मुलगी झाल्याने सर्व आनंद व्यक्त करत होते. मात्र, यानंतर रोहिणीच्या पोटात दुखणे व उलट्या व्हायल्या लागल्या. डॉ. कालिंदी राणे हिला याची माहिती दिली. तिने याकडे दुर्लक्ष केले. असे होतच असते असे सांगून नर्सच्या सहाय्याने उपचार केले. मात्र, पोट दुखणे काही कमी झाले नाही. शेवटी दोन तासानंतर डॉक्टर राणे आल्या व त्यांनी तपासणी करुन पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेवून गेल्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहताच त्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयातील बाल रोगतज्ज्ञ डॉ. नंदकिशोर कोल्हे, डॉ. कदम व भुलतज्ज्ञ डॉक्टरला बोलावले. मात्र, कोणताच उपयोग झाला नाही. शेवटी रोहिणी उर्फ गौरी डवरे हिचा मृत्य झाला.

डॉ. राणे यांनी वेळीच तक्रारीची दखल घेऊन लगेच उपचार सुरू केला असता तर माझ्या पत्नीचा जीव गेला नसता. याला डॉक्टरची दिरंगाई व सिझेरियन करताना केलेली चूक जबाबदार आहे, असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. डॉक्टरांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी, अशी तक्रार पती अभीजीत डवरे यांनी येथील पोलिसांत केली आहे.

कॅमेऱ्याच्या देखरेखीत शवविच्छेदन -

तक्रार प्राप्त होताच शासकीय यंत्रणा जागृत झाली असून मृताचे शव विच्छेदन कॅमेऱ्याच्या देखरेखीत करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बाल रोगतज्ज्ञ डॉ. वंदना वावरे, डॉ. उज्वल देवकाते, डॉ. अतुल गहुरकर, वर्धेचे डॉ. मुडे व नायब तहसिलदार विनायक मगर यांचे पॅनल नेमले आहे.

मोबाईलच्या लाईटमध्ये तपासणी केल्याचा आरोप -

रोहिणी हिची प्रकृती ढासळल्यानंतर तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेवून गेले. मात्र, या दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाला होता, तर जनरेटरसुद्धा बंद होते. अशा अवस्थेत मोबाईलच्या लाईटमध्ये डॉक्टरांनी उपचार सुरू केले, असा आरोप मृताचे पती अभीजीत डवरे यांचे आहे.

म्हणायला मल्टीस्पेशालिटी, मात्र सुविधेचा अभाव -

राणे रुग्णालय हे म्हणायला मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आहे. मात्र, येथे सुविधेचा अभाव आहे. या हास्पीटलमध्ये मोठमोठे ऑपरेशन केले जाते. मात्र, जनरेटर सतत नादुरस्त राहते. रक्तपेढीची सुविधा नाही. रुग्णाला लागणारे रक्त बाहेर गावावरुन बोलवावे लागते. मृतक महिलेला अतिरक्तस्त्राव झाला. मात्र, वेळेवर तिला रक्त मिळू शकले नाही. शिवाय विद्युत सुविधा देखील नव्हती, असेही आरोप केले जात आहेत.

सिझेरीयन करताना पोटातील नस कापल्याचा संशय -

सिझेरीयन केल्यानंतर रोहिणीच्या पोटाला फुगारा आला होता. शिवाय उलट्यासुध्दा सुरू झाल्या होत्या. सिझेरियन करताना डॉक्टरांकडून चुकीने पोटातील एखादी नस कापली गेली असावी, आणि पोटात रक्त जमा झाले असावे, असा संशय एका तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त -

वातावरण तापू लागल्याची माहिती मिळताच ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी हास्पीटलमध्ये तगडा बंदोबस्त लावला होता व ते स्वत: पहाटे पाच वाजेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही.

शर्थीचे प्रर्यत्न केले. मात्र, अपयश आले -

रोहिणीला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. बाहेरील डॉक्टरांनासुद्धा पाचारण करण्यात आले. सुमारे पाच तास आमचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आम्हाला यश आले नाही, असे डॉ. कालिंदी राणे यांनी सांगितले.

loading image
go to top