टॅंकरच्या हॉर्नमुळे गोंधळली महिला; ५० फूट फरफटत नेल्याने जागीच मृत्यू

Woman dies after falling under tanker
Woman dies after falling under tanker

भंडारा : महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या टॅंकरच्या हॉर्नमुळे गोंधळून खाली पडलेल्या महिलेला टॅंकरने ५० फूट फरफटत नेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खरबी नाका येथे शुक्रवारी (ता. २३) दुपारी घडली. मृत महिलेचे नाव सुरेखा प्रेमलाल गायधने (वय ४३, रा. मौदा) आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौदा (जि. नागपूर) येथील महिला मुलासोबत स्कुटीने भंडारा मार्गाने कुशारी येथे जात होती. खरबी नाका येथे मागून भरधाव आलेल्या टॅंकरच्या चालकाने त्यांच्या स्कुटीजवळून वाहन नेऊन जोरदार हॉर्न वाजवला. अचानक आलेल्या आवाजामुळे सुरेखा गायधने गोंधळून पडल्या. त्या टॅंकरच्या मागील चाकात आल्याने टॅंकरसोबत ५० फूट फरफटत गेल्या. यामुळे त्यांच्या शरीराचे दोन तुकडे होऊन जागीच मृत्यू झाला. जवाहरनगर पोलिसांनी टॅंकरचालक विशाल ईश्‍वर सोमकुवर (रा. नागपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पती-पत्नीच्या त्रासाने युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्‍यातील चिचगाव येथील संघरत्न मधुकर उके याने फेब्रुवारी महिन्यात एका युवतीचा मोबाईल नंबर मिळवून तिच्यासोबत मैत्री केली. वारंवार भेटून व फोन करून तिचा अनेकदा विनयभंग केला. याबाबत माहिती झाल्यावर संघरत्नची पत्नी दीक्षा उके हिने माझ्या पतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बिघडवले, असा आरोप करून मारण्याची धमकी दिली. अशाप्रकारे पती-पत्नीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिस चौकशीत पीडितेने सांगितल्यामुळे पोलिसांनी पती-पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीला ठार करणाऱ्या पतीस जन्मठेप

१६ जुलै २०१९ ला लालू विज्या कोवासी (वय ४०) याचे पत्नीसोबत शेतात भांडण झाले. रागाच्या भरात त्याने पत्नीला चाकूने भोसकून ठार केले. फिर्यादी विनोद लालू कोवासी याला त्याच्या चार वर्षांच्या मुलीने सांगितल्यावरून आरोपी लालू कोवासीविरुद्ध भामरागड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षीदारांचे व फिर्यादीचे बयाण तसेच आरोपीविद्ध सबळ पुरावे मिळाल्याने व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी कोवासी याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

तलावात आढळला मृतदेह

गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गावर असलेल्या तलावात एका युवकाचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या साहायाने मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. पाण्यात बराच वेळ राहिल्याने मृतदेह फुगला होता तसेच त्यातून दुर्गंधी येत होती. वृत्त लिहीपर्यंत मृताची ओळख पटली नव्हती.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com