esakal | लॉकडाउनमुळे अडकलेल्या मावशीला भाची दुचाकीने गावी घेऊन जात होती; मात्र वाटेत काळ आला आडवा...
sakal

बोलून बातमी शोधा

Woman dies in road accident

साकोली येथे राष्ट्रीय महामार्गावर काळ बनून आलेल्या वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की गौतमी यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक तेजस सावंत व राजेश भजने घटनेचा तपास करीत आहेत. 

लॉकडाउनमुळे अडकलेल्या मावशीला भाची दुचाकीने गावी घेऊन जात होती; मात्र वाटेत काळ आला आडवा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साकोली (जि. भंडारा) : नाव वत्सला अंताराम राऊत... वय 60 वर्षे... रा. जांभळी (डव्वा), जि. गोंदिया... या लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी नागपूरला आल्या... मात्र, लॉकडाउन सुरू झाल्याने दीड महिन्यापासून नागपुरात अडकल्या... गावाची ओढ लागल्याने त्यांनी गावी जाण्याचा आग्रह धरला... मात्र, लॉकडाउनमुळे बससेवा बंद आहे. जायचे कसं असा प्रश्‍न त्यांना पडला... त्यामुळे भाचीने त्यांना स्कुटीने नेऊन सोडण्याचा निर्णय घेतला... वाटेत काळ भाचीची वाट पाहत होता... 

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सारेकाही प्रभावित झाले आहेत. कोरोनामुळे दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू आहे. संचारबंदी व जिल्हाबंदी असल्याने सारे जागच्या जागीच अडकले आहेत. प्रवासाची सारी साधनेही लॉकडाउन झाली आहेत. शहरातल्या शहरात फिरता येत नसल्याने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. यामुळे दुसऱ्यांच्या घरी अडकून पडलेल्या पाहुण्याचे चांगलेच हाल होत आहेत. यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

क्लिक करा -  दोघा जीवलग मित्रांत दारू पिताना झाला वाद, आणि नंतर मात्र जीवावरच बेतले...

गोंदिया जिल्ह्यातील जांभळी (डव्वा) येथील रहिवासी साठ वर्षीय वत्सला यांनी भाचीची आठवण आल्याने नागपुरात आल्या. त्या नागपुरात आल्या आणि कोरोनामुळे देशात लॉकडाउनला सुरुवात झाली. यामुळे त्या दीड महिन्यापासून रेडझोनमध्ये असलेली नागपुरातील भाची गौतमी जयदेव सहारे (वय 38, रा. आदर्शनगर, राणी दुर्गावती चौक) यांच्याकडेच अडकून राहिल्या. बरेच दिवस राहून घराची ओढ लागलेल्या त्यांनी गावी जाण्याचा आग्रह धरला. 

परंतु, लॉकडाउनमुळे बससेवा बंद आहेत. गावी जाणार कसं असा प्रश्‍न त्यांच्या मनात घर करीत होता. मावशीची ही स्थिती पाहून भाचीला राहावले गेले नाही. त्यामुळे त्यांनी मावशीला स्कुटीने गावी सोडून देण्याचा निर्णय घेतला. शनिवारी पहाटेच गौतमी या मावशीला घेऊन स्कुटीने गोंदियाला जाण्यास निघाली. साकोली येथे राष्ट्रीय महामार्गावर काळ बनून आलेल्या वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की गौतमी यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक तेजस सावंत व राजेश भजने घटनेचा तपास करीत आहेत.

अधिक माहितीसाठी - लाॅकडाउनमध्ये प्रेमीयुगूल झाले सैराट, का वाढली पळापळी?...वाचा

मावशीची प्रकृती गंभीर

साकोली येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. याच भागात सकाळी सात वाजताच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात गौतमी यांचा जागीच मृत्यू झाला. मावशी वत्सला यांची प्रकृती गंभीर आहे. उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

मावशीचा हट्ट जिवावर बेतला

वृद्ध मावशीला भाचीची आठवण आल्याने नागपुरात आल्या. परंतु, लॉकडाउन सुरू झाल्याने त्यांना घरी परत जाता आले नाही. त्यांनी घराची ओढ लागली होती. जाण्यासाठी साधन नसल्याने नागपुरात राहण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याजवळ नव्हता. तरीही त्या घरी जाण्याचा आग्रह करीत होत्या. त्याची ही स्थिती भाचीला पाहवसी वाटली नाही. त्यामुळे त्यांनी मावशीला गाडीने सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, वाटेत वाट पाहणाऱ्या काळाने भाचीचा जीव घेतला.