अन्‌ कोविड रुग्णालयात बालिका जन्माला आली...कोरोना योद्‌ध्यांसह मातेचे अभिनंदन

भंडारा : कोविड रुग्णालयातील नवजात बालिका.
भंडारा : कोविड रुग्णालयातील नवजात बालिका.

भंडारा : देशात कोरोनाची लागण झाल्याने सुरू असलेले लॉकडाउन, वाहतुकीच्या साधनांचा अभाव असताना केलेला लांबलचक प्रवास, त्यानंतर जिल्ह्यात विलगीकरणाची सक्ती अशावेळी मातेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने आता कसे होणार? असा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र, कोरोना योद्धे डॉक्‍टर, परिचारिकांच्या मदतीने मातेची नॉर्मल प्रसूती झाली अन्‌ येथील नवनिर्मित कोविड रुग्णालयात गुटगुटीत बालिकेने पहिला श्‍वास घेताच सर्वांनी आनंद व्यक्त केला.

देशात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आले आहे. प्रवासाची साधने बंद असल्याने कामगार व मजूरवर्ग जिथे तिथेच अडकून पडला आहे. यामुळे राज्यातील मुंबई, पुणे या महानगरात रोजगारासाठी गेलेले शेकडो मजूर कुटुंबासमोर अडचण निर्माण झाली होती. शेवटी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून त्यांच्यासाठी विशेष रेल्वे व बसगाड्या सुरू करण्यात आल्या.

महिला 22 मे रोजी जिल्ह्यात परतली

भंडारा जिल्ह्यातील एक कुटुंब पालघर येथे अडकले होते. या कुटुंबातील 28 वर्षीय महिला नऊ महिन्याची गर्भवती होती. पती व सोबत असलेल्या इतरांच्या मदतीने ती बसद्वारे खडतर प्रवास करीत 22 मे रोजी जिल्ह्यात परत आली. पालघर येथून या कुटुंबाला राजेदहेगाव येथील विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. आज, सोमवारी सकाळपासून मातेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील असल्याने प्रसूती कुठे करावी, असा पेच रुग्णालय प्रशासनासमोर निर्माण झाला.

नवनिर्मित कोविड रुग्णालयात प्रसूती

शेवटी मातेची सुटका करण्यासाठी नवनिर्मित कोविड रुग्णालयात त्वरित प्रसूतिगृह तयार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका श्रीमती निशा वैद्य यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता गरोदर मातेला धीर देत उपचार दिले. अशा संकटात आता कोणती वेळ येईल? असा विचार आरोग्य कर्मचारी करत असतानाच मातेची सुखरूप प्रसूती होऊन बालिका जन्माला आली.

मातेचे डॉक्‍टरांनी केले कौतुक

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चंचल खोब्रागडे, शिशू उपचारतज्ज्ञ डॉ. मुनेश्‍वर भोंगाडे आणि परिचारिका, कर्मचाऱ्यांनी बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकताच एकमेकांचे अभिनंदन केले. या संकटाच्या काळात राज्याच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंच प्रवास करणाऱ्या मातेचे डॉक्‍टरांनी कौतुक केले आहे. आता मातेचा नमुना कोरोना तपासणीसाठी पाठविला जाईल, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com