esakal | जावयाला पैसे द्यायचे नसल्याने रचला चोरीचा बनाव, CCTV मुळे सत्य उघड
sakal

बोलून बातमी शोधा

crime

जावयाला पैसे द्यायचे नसल्याने रचला चोरीचा बनाव, CCTV मुळे सत्य उघड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जावयाने तीन लाख रुपये मागितले, ते त्यांना द्यायचे नव्हते, परंतु एकदम नकार सुद्धा देऊ शकत नाही. त्यामुळे पैशाची बॅग पाठलाग करणाऱ्या दुचाकीस्वाराने बळजबरीने हिसकावल्याची तक्रार त्यांनी दिली. मात्र, ही तक्रार बनावट असल्याची बाब पोलिसांनी (amravati police) केलेल्या चौकशीतून पुढे झाली.

हेही वाचा: खासदार तडस यांच्या कौटुंबिक वादात मोठा ट्विस्ट, मुलगा-सुनेचं वैदीक पद्धतीनं लग्न

सोमवारी (ता. 6) रात्री साडेसात ते आठच्या सुमारास सदर महिला बाहेर गावावरून अमरावतीत आली. मुलीकडे जाण्यासाठी ती ऑटोमध्ये बसली. ऑटोने साईनगर चौकात उतरविले. तेथून मुलीच्या घराकडे जात असताना, रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने या महिलेच्या हातातील 3 लाख रुपये असलेली बॅग हिसकावली. अशी तक्रार सदर महिलेने बडनेरा ठाण्यात नोंदविली. रहदारीच्या रस्त्यावर ही घटना घडल्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली. बडनेरा, गुन्हेशाखेच्या पोलिसांनी परिसरात चौकशी सुरू केली. अखेर महिलेच्या तक्रारीवरून त्याच दिवशी पसार दुचाकीस्वाराविरुद्ध जबरीचोरीचा गुन्हा सुद्धा दाखल केला. परंतु घटनेनंतर दोन दिवसांनी महिलेची सखोल चौकशी बडनेरा पोलिसांनी केली. तिचे सविस्तर बयाण सुद्धा नोंदविले. त्यामध्ये सदर महिलेने तीन लाखाची बॅग चोरीस गेली नसल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. पैसे जवळ होते. परंतु ते जावयाला द्यायचे नव्हते. त्यामुळे आपण अशी खोटी तक्रार पोलिसांत नोंदविल्याची कबुली तिने दिली.

सीसीटीव्ही फुटेजमुळे सत्य उघड -

लुटमारीच्या तक्रारीनंतर बडनेरा पोलिसांनी बेनामचौक, साईनगर ते अकोली मार्गावरील पाच ते सहा ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिलेच्या एका हातात केवळ मोबाईल होता. दुसऱ्या हातात काहीच दिसत नव्हते. ही बाब पोलिसांनी महिलेच्या निदर्शनात आणून दिली असता, तिने सत्य पोलिसांपुढे उघड केले.

जनतेने कोणत्याही प्रकरणाची खोटी तक्रार पोलिसांत नोंदवू नये, अशा लोकांविरुद्ध खोटा रिपोर्ट दिल्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येते. त्यामध्ये गुन्हा सिद्ध झाल्यास 2 ते 7 वर्षाची शिक्षेची तरतूद आहे.
-पंजाब वंजारी, पोलिस निरीक्षक, बडनेरा ठाणे.
loading image
go to top