चॉकलेटचे आमिष दाखवून ७ वर्षीय मुलाचे अपहरण; चाकूने केले जखमी

साईनाथ सोनटक्के
Saturday, 3 October 2020

तुकुम परिसरातील सतीश खोब्रागडे यांच्या घरी हुमकेश्‍वर त्र्यंबक पाटील (वय 45) हे किरायाने कुटुंबीयांसह राहतात. त्यांना 7 वर्षांचा विधान हा मुलगा आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तो घराबाहेर खेळत होता. खेळत असताना अचानक तो बेपत्ता झाला.

चंद्रपूर : चॉकलेटचे आमिष दाखवून एका महिलेने सात वर्षीय मुलाला दुचाकीने पळवून नेल्याची घटना 1 ऑक्‍टोबरला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. काही नागरिकांनी सतर्कता दाखवित मुलगा आणि महिलेला रामनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. त्यानंतर मुलगा कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचला. याप्रकरणी नीलिमा भास्करराव शेंडे या महिलेविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुकुम परिसरातील सतीश खोब्रागडे यांच्या घरी हुमकेश्‍वर त्र्यंबक पाटील (वय 45) हे किरायाने कुटुंबीयांसह राहतात. त्यांना 7 वर्षांचा विधान हा मुलगा आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तो घराबाहेर खेळत होता. खेळत असताना अचानक तो बेपत्ता झाला. काही वेळानंतरच कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, कुठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे सर्व कुटुंबीय चिंतेत पडले. अशात एकाने फोन करून सांगितले की, तुमच्या मुलाला आणि एका महिलेला रामनगर पोलिस ठाण्यात घेऊन आले. यानंतर पाटील कुटुंबीयांनीही रामनगर पोलिस ठाण्यात तातडीने धाव घेतली.

हेही वाचा - अखेर कोरोना चाचणी केंद्र सुरू, मध्य रेल्वेतील कर्मचारी व कुटुंबीयांना दिलासा

विधान याने नीलिमा शेंडे या महिलेने चॉकलेटचे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून नेल्याचे सांगितले. चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहारा गावाजवळील एका पुलावर संबंधित महिला विधानच्या गळ्यावर, पोटावर चाकूने ओरबडत होती. त्याचे व्रण विधानच्या शरीरावर आहेत. या प्रकाराने भयभीत झालेल्या विधानने आरडाओरड केली.  हा आवाज ऐकताच या मार्गाने जाणाऱ्या दोन व्यक्तींनी त्याकडे धाव घेऊन विधानला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सर्व घटनाक्रम ऐकून घेतला. त्यानंतर सदर महिला आणि मुलासह थेट रामनगर पोलिस ठाणे गाठले.

तोंडी तक्रारीनंतर रामनगर पोलिसांनी नीलिमा शेंडे या महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सदर महिला मानसिक रुग्ण असल्याचेही बोलले जाते. मात्र, नेमके तिने विधानचे अपहरण कोणत्या कारणातून केले, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा - नागपुरातील सिताबर्डी मुख्य रस्ता होणार 'व्हेईकल फ्री झोन', लवकरच प्रस्तावावर शिक्कामोर्तब

यवतमाळातील कलगावात विद्यार्थ्याची आत्महत्या - 
महागाव येथून जवळच असलेल्या कलगाव येथील विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी पाळण्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.  गुरुवारी ही घटना उघडकीस आली. विशाल भारत हातमोडे, असे मृताचे नाव असून त्याने अकरावीत प्रवेश घेतला होता.

वडील भारत हातमोडे व मोठा भाऊ नितीन हे दोघेही गवंडी कामाला व आई शेतात गेली होती. दुपारी घरी कुणीच नसताना विशालने आत्महत्या केल्याची माहिती गावचे पोलिस पाटील नारायण उकन्डे यांनी महागाव पोलिसांना दिली. या घटनेची माहिती विशालचे मोठे भाऊ नितीन हातमोडे (वय 25) यांनी महागाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, विशालने आत्महत्या का केली, याचे कारण अजून समजू शकले नाही. या घटनेने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman kidnapped 7 years old boy in chandrapur