अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 January 2020

विवाहानंतर सासरच्या मंडळींशी वाद असल्याने त्रिवेणीचे सिंदखेडराजा कोर्टात प्रकरण सुरू होते. कोर्टाची तारीख असल्याने त्रिवेणी तिचे वडील गुलाबराव चाटे व मुलगी तृप्ती हे माहेर असलेल्या दरेगाव येथून मोटारसायकलने सिंदखेडराजा कोर्टात आले होते.

किनगावराजा (जि.बुलडाणा) : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एका 27 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना आज ता. 3 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास किनगावराजा ते दुसरबीड दरम्यान हॉटेल गौरव जवळ घडली.

त्रिवेणी संतोष डोळे (वय 27) हिचा विवाह टिटवी, ता. लोणार येथील संतोष डोळे यांच्याशी झालेला आहे. उभयतांना तृप्ती उर्फ राणी (वय 12) वर्षाची मुलगी व प्रफुल (वय 9) मुलगा आहे. विवाहानंतर सासरच्या मंडळींशी वाद असल्याने त्रिवेणीचे सिंदखेडराजा कोर्टात प्रकरण सुरू होते. आज कोर्टाची तारीख असल्याने त्रिवेणी तिचे वडील गुलाबराव चाटे (वय 57) व मुलगी तृप्ती हे माहेर असलेल्या दरेगाव येथून मोटारसायकल (क्रमांक एम. एच. 28 ए. एम. 9121) द्वारे सिंदखेडराजा कोर्टात आले होते. 

हेही वाचा - एसटी बसच्या धडकेत दिव्यांग शिक्षकाचा मृत्यू

दुचाकीला मागून धडक; चालक फरार
कामकाज संपल्यानंतर सायंकाळी दरेगाव येथे दुचाकीवरुन परतत असताना किनगावराजा ते राहेरी दरम्यान असलेल्या हॉटेल गौरव नजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात त्रिवेणी संतोष डोळे ही घटनास्थळीच ठार झाली. तर वडील गुलाबराव चाटे व मुलगी तृप्ती उर्फ राणी हे दोघे जखमी झाले आहेत. दुचाकीला धडक दिल्यानंतर चालकाने अज्ञात वाहन घटनास्थळावरुन घेऊन फरार झाला आहे. 

हेही वाचा - निष्काळजी धोकादायक

वडिल जखमी तर मुलगी ठार
अपघातात जखमी झालेले गुलाबराव चाटे व मुलगी तृप्ती यांच्यावर किनगावराजा येथील डॉ. शिवानंद जायभाये यांच्या दवाखान्यात उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे रवाना करण्यात आले आहे. तर त्रिवेणी डोळे हिचा मृतदेह सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजून गुन्हा दाखल झाला नसला तरीही घटनेच्या अनुषंगाने किनगावराजा पोलिस तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman killed in unknown vehicle collision