esakal | अमरावती : मृत बाळ जन्मल्यानंतर महिला गेली पळून; दोन तास कर्मचाऱ्यांना फोडला घाम
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावती : मृत बाळ जन्मल्यानंतर महिला गेली पळून

अमरावती : मृत बाळ जन्मल्यानंतर महिला गेली पळून

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या मनभंग येथील आदिवासी महिलेला पुढील उपचारासाठी अमरावतीत रेफर केले होते. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना चुकवून ती आदिवासी महिला पळून गेल्याची घटना घडली. यामुळे मेळघाटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन तास घाम फोडला. अखेर मोथा उपकेंद्राच्या डॉक्टरांनी शोध घेऊन बागलिंगा गावातून महिलेला उपचारासाठी डॉ. पिंपळकर यांनी टेम्ब्रूसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

चिखलदरा तालुक्यातील मनभंग गावातील गर्भवती आदिवासी महिलेला अचानक पोट दुखायला लागल्याने डॉक्टरांनी धामणगाव गढी आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, येथे पुरेशी व्यवस्था नसल्याने डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले. त्याठिकाणी महिलेची प्रसूती झाली. मात्र, बाळ उपजत मृत जन्माला आले. तर महिलेची प्रकृती चिंताजनक होत गेली. अशातच महिलेला मिरगीचे झटके यायला लागले. त्यामुळे डॉक्टरांनी अमरावती येथे रेफर करण्याचे ठरविले.

हेही वाचा: चंद्रपूर : बल्लारपुरात पुन्हा टोळीयुद्ध, एकाची हत्या

याबाबतची माहिती महिलेच्या नातेवाइकांना दिली. त्यानंतर रेफर करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच महिला नातेवाइकाच्या मोटरसायकलवर कर्मचाऱ्यांना चुकवून पळून गेली. त्यानंतर महिलेची शोधाशोध सुरू झाली. मात्र, ती मिळाली नाही. याबाबतची माहिती मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच गाव शोधले मात्र काही थांगपत्ता लागला नाही. अखेर आशा सेविकेला महिलेच्या नातेवाईक कोणत्या गावात राहते याची माहिती मिळाली.

त्यानुसार टेम्ब्रूसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या बागलिंगा गावात नातेवाइकांच्या माध्यमातून भगताकडे उपचारासाठी गेल्याची माहिती मिळाली. याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांना दिली. तालुका व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता टेम्ब्रूसोंडा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविले.

डॉक्टरांनी सुद्धा वेळेचे गांभीर्य ओळखून टीमसह बागलिंगा गाठले आणि महिलेला नातेवाइकांच्या घरून आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, या दरम्यान उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांनी महिला रुग्णालयातून पळून गेल्याची तक्रार नोंदवली होती.

हेही वाचा: अमरावती कारागृहातील वृद्ध बंदीचा मृत्यू

अमरावतीला जावे लागणार म्हणून महिला पळून गेली. दोन तास शोध घेतल्यानंतर बागलिंगा गावात नातेवाइकांकडे गेल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार टेब्रुसोंडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तत्काळ पोहोचले व महिलेला उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल केले.
- डॉ. नीता नागले, वैद्यकीय अधिकारी, मोथा
वरिष्ठांच्या सूचनेनुसार बागलिंगा गावात उपजिल्हा रुग्णालयातून महिला पळून आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कर्मचाऱ्यांसह दहा वाजता गावात पोहोचलो. गावात शोधून महिलेला आरोग्य केंद्रात दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.
- डॉ. चंदन पिंपळकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, टेंब्रुसोंडा
loading image
go to top