पाहुणपणाला आलेली महिला गावाला गेली, कपाट बघितले अन् कुटुंबीयांच्या पायाखालची सरकरली जमीन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 March 2021

वणी येथील गुरुनगरात वास्तव्यास असलेल्या अल्का संजय गंधेवार (वय 40) यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील टुंड्रा येथे राहणारी संशयित सुरेखा इम्मडवार (वय 55) ही महिला पाहुणपणासाठी म्हणून आली होती.

यवतमाळ : पाहुणपणाला आलेल्या महिलेनेच कपाटातील दागिन्यांसह रोख रक्कमेवर हात साफ करून पोबारा केला. या प्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. मात्र, दीड महिना होऊनही तपास पुढे सरकला नाही. मुद्देमाल मिळविण्यासाठी फिर्यादीलाच पोलिस ठाण्यात पायपीट करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा - रात्रंदिवस राबून जोपासलं पीक अन् पशूधन, पण एक ठिणगी पडली अन् सर्वच संपलं

वणी येथील गुरुनगरात वास्तव्यास असलेल्या अल्का संजय गंधेवार (वय 40) यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील टुंड्रा येथे राहणारी संशयित सुरेखा इम्मडवार (वय 55) ही महिला पाहुणपणासाठी म्हणून आली होती. 12 जानेवारी रोजी आलेली महिला मुक्काम करून घोन्सा येथे जुन्या शेतीचे पैसे मागण्यासाठी गेली. तेथून आल्यावर परत मुक्काम केला. महिला व मुलगी कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून कपाटातील रोख 22 हजार, कानातील सोन्याचे झुमके, पोत, कानवेल,लग्नात मिळालेल्या भेटवस्तू, असा एकूण 80 हजार 787 रुपयांचा मुद्देमाल लांबविला. 16 जानेवारीला महिला आपल्या गावी निघून गेली. दुसऱ्या दिवशी अल्का गंधेवार या कपाटाची साफसफाई करीत असताना चोरीची घटना लक्षात आली. फोनवर संपर्क करून चोरीबाबत विचारणा केली असता, महिलेने कानावर हात ठेवले. आमच्याकडे आल्यास हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी गंधेवार यांनी वणी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून संशयित सुरेखा इम्मडवार हिच्याविरुद्घ गुन्हा नोंदविला. मात्र, तपास पुढे सरकला नाही. 

हेही वाचा - मुलींची निर्वस्त्र पूजा प्रकरण : भोंदूबाबाकडे सापडले शेकडो मुलींचे फोटो; लैंगिक...

दागिन्याची किंमत लाखांच्या घरात -
महिलेने झुमके, सोन्याचा हार, कानवेल, पोत व रोख 22 हजार उडविले. पोलिसांनी जुन्या दरानुसार किंमत लावली. मात्र, हेच दागिने आजच्या भावानुसार जवळपास तीन लाखांच्या घरात असल्याचे फिर्यादी महिलेचे म्हणणे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman stolen jewelry in yavatmal crime news