महिलांचा प्रसाधनगृहांचा शोध संपता संपेना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

शहराच्या महापौरपदी महिला असूनही बाजारपेठ व रस्त्याच्या कडेला महिलांचा प्रसाधनगृहाचा शोध अद्यापही सुरूच आहे. २४ लाखांवरील लोकसंख्येमध्ये निम्मा सहभाग असलेल्या महिलांबाबत महापालिकेची उदासीनता सुरूच असल्याचे चित्र पुढे आले आहे.

नागपूर - शहराच्या महापौरपदी महिला असूनही बाजारपेठ व रस्त्याच्या कडेला महिलांचा प्रसाधनगृहाचा शोध अद्यापही सुरूच आहे. २४ लाखांवरील लोकसंख्येमध्ये निम्मा सहभाग असलेल्या महिलांबाबत महापालिकेची उदासीनता सुरूच असल्याचे चित्र पुढे आले आहे.

नागरिकांच्या विरोधामुळेही प्रसाधनगृहे कागदावरच आहे. तोडगा काढण्याऐवजी मनपा प्रशासन हातावर हात धरून बसल्याने महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महिलांसाठी शहरात केवळ १७३ ठिकाणी सहाशे प्रसाधनगृहे आहेत. शहरात महापालिकेच्या १०२ ठिकाणी सार्वजनिक शौचालये आहेत. यात पुरुषांसाठी ४८८ सीट्‌स असून, महिलांसाठी केवळ २८५ सीट्‌स आहेत. यात सुलभ इंटरनॅशनलने तयार केलेल्या ५४ प्रसाधनगृहांचा समावेश आहे. झोपडपट्टी आदी वस्त्यांसाठी ७१ ठिकाणी सामुदायिक शौचालये तयार केली आहे. यात पुरुषांसाठी ३०१ तर महिलांसाठी ३२१ सीट्‌स आहे. ही प्रसाधनगृहे केवळ वस्त्यांसाठी आहे. वस्त्यांमधील प्रसाधनगृहांचा अपवादवगळता शहरात कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी केवळ २८५ सीट्‌स असून, त्या अपुऱ्या असल्याचे सूत्राने नमूद केले. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर बाजार भरतो. बाजारात अनेक महिला भाजीविक्रेत्या राहतात. त्याचप्रमाणे खरेदीसाठी येणाऱ्या महिलाही तास-दोन तास बाजारात असतात. अशा रस्त्यांवरील बाजाराच्या ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृहाची बोंब आहे.

त्यामुळे महिलांची कुचंबणा होत असून, आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. इतवारी, महाल, बर्डीसारख्या बाजारपेठ असलेल्या ठिकाणी प्रसाधनगृहे आहेत; परंतु ते तोकडे असल्यानेही या ठिकाणी असलेल्या दुकानात काम करणाऱ्या तसेच खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रसाधनगृहे तयार करण्यासाठी जागा निश्‍चित करण्यास गेले असता अनेकदा नागरिक आणि नगरसेवकही विरोध करीत असल्याचे अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

रोटरी इशान्यकडून १५ प्रसाधनगृहे हस्तांतरित
रोटरी इशान्यने विविध कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या सीएसआर फंडातून महिलांसाठी ५० प्रसाधनगृहे तयार करून देण्याचा प्रस्ताव दिला होता. यातील १५ प्रसाधनगृहे तयार झाली. ते महापालिकेला हस्तांतरित केल्याचे रोटरी इशान्यचे राहुल लद्धड यांनी सांगितले. महापालिकेने व्यवस्थित देखभाल केल्यास शिल्लक ३५ प्रसाधनगृहेही तयार करण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

अधिकारी उवाच
रोटरी इशान्यला सीएसआर निधी न मिळाल्याने पुढील प्रसाधनगृहांचे काम रखडले. सीएसआर निधी मिळाल्यास रोटरी इशान्य शिल्लक ३५ प्रसाधनगृहे तयार करतील, असे महापालिकेच्या स्लम विभागातील उपअभियंता खोत यांनी सांगितले.

Web Title: Woman Toilet Searching City Municipal