Video : चंद्रपूर जिल्ह्यातही आहे बबिता फोगाट... वाचा

दीपक अडकिने
शनिवार, 18 जानेवारी 2020

भिसी (चंद्रपूर) : आमीर खानचा "दंगल' सिनेमा अनेकांनी बघितला असेल. फोगाट भगिनीतील एक बहीण कुस्तीच्या फडात थेट एका पुरुष मल्लाशी दोन हात करते. त्याचीच पुनरावृत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथील फडात घडली. इथे पुरुष मल्लाशी बारावीत शिकणाऱ्या तन्नू मुकेश जाधव या विद्यार्थिनीने दोन हात केले.

भिसी (चंद्रपूर) : आमीर खानचा "दंगल' सिनेमा अनेकांनी बघितला असेल. फोगाट भगिनीतील एक बहीण कुस्तीच्या फडात थेट एका पुरुष मल्लाशी दोन हात करते. त्याचीच पुनरावृत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथील फडात घडली. इथे पुरुष मल्लाशी बारावीत शिकणाऱ्या तन्नू मुकेश जाधव या विद्यार्थिनीने दोन हात केले.

मकरसंक्रांतीच्या पर्वावर भिसी (ता. चिमूर) येथील हनुमान व्यायाम मंडळ आणि जोड मारोती देवस्थानच्या सौजन्याने कुस्तीच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. भिसीतील विठ्ठल-रुख्माई देवस्थानच्या पटांगणावर झालेल्या या दंगलीत ब्रह्मपुरी तालुका कुस्तीगीर संघाची खेळाडू असलेल्या तन्नू मुकेश जाधव या विद्यार्थिनीने एका युवकासोबत कुस्ती खेळली. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला व अनिर्णित राहिला.

बारावीत शिकणाऱ्या तन्नूने बलदंड शरीरयष्टीच्या युवकाशी दिलेली कडवी झुंज बघून आमिर खानच्या "दंगल' चित्रपटातील मुलीच्या कुस्तीची प्रत्येकाला आठवण झाली. यावेळी तन्नूने सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

कुस्तीच्या दंगलीत मुलींचे, बालकांचे, वयस्कांचे आणि युवकांच्या कुस्तीचेही मनोरंजक सामने बघायला मिळाले. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा व वर्धा जिल्ह्यातील पहेलवान यात सहभागी झाले होते. मात्र लक्षवेधी ठरली ती तन्नू.

काय झालं असावे ? - आठवडी बाजारासाठी ते गप्पा मारत निघाले आणि थरकाप उडाला, वाचा काय झाले... 

या दंगलीचे उद्‌घाटन धनराज मुंगले, गजेंद्र चाचरकर यांच्या उपस्थितीत झाले. प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे, भिसीचे ठाणेदार मनोज गभणे उपस्थित होते. कुस्ती जिंकणाऱ्या प्रत्येक पहेलवानाला मंडळातर्फे आणि पाहुण्यांतर्फे स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तूही देण्यात आल्या.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman wrestler in Chandrapur District of Maharashtra