esakal | 'ती' प्रसूतीच्या वेदनेनं विव्हळतं होती, पण डॉक्टरच नसल्यानं रुग्णावाहिकेतच झाली प्रसूती

बोलून बातमी शोधा

phc
'ती' प्रसूतीच्या वेदनेनं विव्हळतं होती, पण डॉक्टरच नसल्यानं रुग्णावाहिकेतच झाली प्रसूती
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चामोर्शी (जि. गडचिरोली) : चामोर्शी तालुक्‍यातील रेगडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही डॉक्‍टरच उपलब्ध नसल्याने येथील 26 वर्षीय गर्भवती महिलेची तालुकास्थळी चामोर्शीकडे जात असताना रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली.

हेही वाचा: बाबू होणार शिपाई, पदोन्नतीचा आनंद फक्त महिनाभरच

या आरोग्य केंद्रात एक नियमित डॉक्‍टर आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या भयंकर काळातही हे डॉक्‍टर गैरहजर असल्याने रुग्णांचे मोठे हाल सुरू आहेत. डॉक्‍टर नसल्याने आरोग्य केंद्रातील कंपाउंडर आणि नर्स याच रुग्णांना तपासत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रेगडीसारख्या दुर्गम भागात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. शुक्रवार (ता. 30) एक गर्भवती प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आली होती. पण, येथे डॉक्‍टरच उपस्थित नसल्याने तिला चामोर्शीकडे जावे लागले. मात्र, प्रसूतीकळा वाढत असताना रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती झाली. सुदैवाने महिला व बाळ सुखरूप आहे. मात्र, ऐन वेळेवर डॉक्‍टर उपस्थित नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गरंजी, वेंगणूर, विकासपल्ली आदी गावातील रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, डॉक्‍टर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे उपचाराअभावी रुग्णांना परत जावे लागत आहे. सध्या हे डॉक्‍टर सुटीवर असल्याचे कळते. पण, अशा कोरोनाच्या काळात या डॉक्‍टरांना सुटी कशी काय दिली व पर्यायी व्यवस्था का केली नाही, असे प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णांना योग्य उपचार द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

'या घटनेबद्दल मी स्वत: माहिती घेईल. त्यानंतर योग्य ती चौकशी करून कुणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल.'
- डॉ. लायबर, तालुका आरोग्य अधिकारी, चामोर्शी