महिलांमध्ये वाढतेय युरिन इन्फेक्‍शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

तीन लीटर पाणी आवश्‍यक 
युरिन इन्फेक्‍शन झाल्याने युरिनरी ब्लॅडरमध्ये बॅक्‍टेरिया जमा होतात. यापासून बचावासाठी दिवसभरात किमान तीन लिटर पाणी पिणे आवश्‍यक आहे. जेणेकरून युरिनवाटे बॅक्‍टिेरिया निघून जातील. आंबट फळे जसे संत्री आणि लिंबू यात सायट्रिक ॲसिड असते. ज्यामुळे शरीरात असणाऱ्या बॅक्‍टेरियाचा नायनाट होतो. म्हणून युरिन इन्फेक्‍शन दूर करण्यासाठी आंबट फळे खाणे फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नागपूर - वाढत्या तापमानात आरोग्याच्या समस्या डोकं वर काढतात. अशातच महिलांमध्ये युरिन इन्फेक्‍शनचा त्रास वाढला असून, ७० टक्के महिलांना यूटीआयचा त्रास उद्‌भवत असल्याची माहिती स्रीरोग तज्ज्ञांनी दिली. 

बाहेर नोकरी करणाऱ्या महिलांसोबतच महिला पोलिसांमध्ये यूटीआयचा त्रास अधिक प्रमाणात आहे. महिला पोलिसांचे अधिक कामाचे तास, पाणी कमी पिणं, शौचालय अस्वच्छ असल्याने न जाणं या कारणांमुळे या महिलांना यूटीआयचा त्रास होतोय्‌. यापैकी काही महिला पोलिसांना औषधोपचारही देण्यात आल्याचे स्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले. महिला पोलिसांच्या कामाच्या वेळा निश्‍चित नसतात. बाहेर फिरणे, ट्रॅफिक सिग्नलवर उभे राहणे यामुळे बराच वेळ लघवी दाबून धरल्याने युरीन इन्फेक्‍शनचा त्रास होतो. महिला पोलिसांसाठी असलेली शौचालयेही अस्वच्छ असतात. त्यामुळे अनेक जणी जाण्यास टाळाटाळ करतात. महिला सुरक्षेबाबत दक्ष असणाऱ्या महिला पोलिसांच्या आरोग्याबाबत पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची माहिती एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिली.

सेनॅटरी नॅपकीनचा संसर्ग 
सध्या बाजारात विविध कंपन्यांचे सेनॅटरी नॅपकीन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पॅड वापरण्याऱ्या महिलांची संख्या वाढली असली तरी, त्यांच्या किमती अधिक असल्याने प्रत्येक महिला बजेटमध्ये असणाऱ्या सॅनटरी नॅपकिनची निवड करते. परंतु, काही कंपनीच्या सॅनटरी नॅपकीचा संसर्ग होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत महिलांना ग्राहक न्यायालयात तक्रार करता येते. परंतु, महिला आपल्या आरोग्याच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्रीरोगतज्ज्ञ डॉ. भारती टावरी यांनी सांगितले.

यूटीआयची लक्षणं
  लघवीदरम्यान जळजळ
  सतत किंवा तातडीने लघवीला जावंसं वाटणं
  लघवीचा रंग गडद होणं
  कंबर, ओटीपोटात दुखणं

कोणती काळजी घ्यावी
  भरपूर पाणी प्यावं
  नियमित लघवीला जावं
  लघवीला जाणं टाळू नये
  कॉटनचे कपडे घाला
  घट्ट कपडे घालू नये  

आठ ते दहा तास बाहेर काम करणाऱ्या महिलांना युरिन इन्फेक्‍शनचा त्रास उद्‌भवतो. कमी पाणी पिणे, खूप वेळ लघवी दाबून धरणे यामुळे हा त्रास होत असून, सद्य:स्थितीत ७० टक्के रुग्ण युरिन इन्फेक्‍शनने त्रस्त आहेत. वेळीच उपचार न केल्यास, भविष्यात याचे गंभीर परिणाम होतात. 
- डॉ. भारती टावरी, स्रीरोगतज्ज्ञ

Web Title: Women Urine Infection Increase Health Care