esakal | भंडाऱ्यात भुकेल्या मुक्‍या प्राण्यांसाठी या महिला ठरल्या देवदूत
sakal

बोलून बातमी शोधा

भंडारा : कुत्रीच्या पिल्लांची भूक भागविताना महिला.

लॉकडाउनमुळे हॉटेल्स, चिकन सेंटर व बाजारपेठही बंद आहेत. मागील 20 दिवसांपासून तीन महिला स्वत: अन्न तयार करून दररोज रस्त्यावर भटकत असलेल्या श्‍वानांची भूक भागवीत आहेत.

भंडाऱ्यात भुकेल्या मुक्‍या प्राण्यांसाठी या महिला ठरल्या देवदूत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे हॉटेल्स, चिकन सेंटर व बाजारपेठही बंद आहेत. यामुळे शहरातील अनेक भागात मोकाट फिरणारे श्‍वान व इतर प्राण्यांच्या भुकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, या मुक्‍या प्राण्यांसाठी शहरातील तीन मैत्रिणी देवदूत म्हणून धावून आल्या आहेत.

मागील 20 दिवसांपासूनची त्यांची ही धडपड मुक्‍या प्राण्याची भूक भागविण्यासह आरोग्याची काळजी घेत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. तसेच अनेक स्वयंसेवी संस्था, नागरिक मानवता दाखवून या युद्धात आपले योगदान देत आहे. अशाच प्रकारची मानवता मोकाट श्‍वानांची उपासमार होऊ नये, म्हणून देशभरातील प्राणीप्रेमी सरसावले आहेत. त्यांच्या कार्याचा वसा घेत येथील जिल्हा प्राणी क्‍लेश प्रतिबंधक समितीच्या सुरेखा माहुले, प्रीती पारिशे व हर्षदा शिवणकर या तिघींनीही समाजाला आदर्श घालून दिला आहे.

श्‍वानांना आजारावर उपचार

मागील 20 दिवसांपासून या तिघी स्वत: अन्न तयार करून दररोज रस्त्यावर भटकत असलेल्या श्‍वानांची भूक भागवीत आहेत. तसेच श्‍वानांना असलेल्या आजारावर उपचार करीत आहेत. त्याचे हे कार्य निरंतर सुरू आहे. मुक्‍या प्राण्यांना प्रेमाने खाऊ घालत असताना त्यांना प्रसिद्धीची ओढ नाही, हे विशेष.

श्‍वानांची भागविली भूक

दररोज 15 किलो तांदळाचा भात, बिस्कीट, ब्रेड व दुधाचे बॉटल घेऊन तिघीही घरून दुपारी साडेपाच वाजता निघतात. रात्री नऊ वाजेपर्यंत शहरातील सर्व भागात जाऊन मोकाट श्‍वानांना अन्न देतात. त्यांचे हे कार्य मागील अनेक वर्षांपासून सुरू अआहे. मात्र लॉकडाउनमुळे चिकन सेंटर व हॉटेल, उपहारगृहांवर भूक भागविणाऱ्या श्‍वानांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या तिघींनी भुकेल्या श्‍वानांची भूक भागविली आहे.

प्रसिद्धीचा हव्यास नाही

गरिबांना धान्य वाटप करताना राजकीय पक्षाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते केवळ प्रसिद्धीसाठीच कार्य करीत असल्याचे दिसत आहे. एक ते दोन दिवस पुरेल, इतकेच धान्य ते देतात. मात्र, तेच प्रसिद्धीच्या झोतात येतात. मुक्‍या प्राण्यांची भूक भागविली जात असतानाही तिघींही कधीही प्रसिद्धीच्या झोत्यात आल्या नाही. त्यांनी या कार्यातून समाजाला एक आदर्श दाखवून दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत काहींनी मदतीचा हात पुढे केला आहे.

हेही वाचा : खबरदार! या जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश कराल तर...

श्‍वानांच्या आरोग्याची काळजी
लॉकडाउनमुळे समाजातील सर्वच घटक अडचणीत सापडला आहे. मुक्‍या प्राण्यांना बोलता येत नसल्याने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. चिकन सेंटर व हॉटेलच्या उष्ट्या अन्नावर जीवन जगत असलेल्या श्‍वानांसाठी आपली धडपड सुरू आहे. अन्नासह त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.
- सुरेखा माहुले
जिल्हा प्राणी क्‍लेश प्रतिबंधक समिती.

loading image