मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम निकृष्ठ; टाकरखेड येथील मोरीचे जॉईंट जोडलेच नाही

विरेंद्रसिंह राजपूत
रविवार, 26 ऑगस्ट 2018

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे रा. मा. २७२ खैरा ते टाकरखेड तालुका हद्द रस्ता दर्जोन्नत अंतर्गत ७.२३ कि. मी. अंतराचे हे काम असून त्यात डांबरी रस्ता ६.७५ कि. मी, सिमेंट रस्ता ०.४८ कि. मी, पाईप मोऱ्या १० नग व स्लॅबड्रेन ३ नग चा अंतर्भाव आहे.

नांदुरा (बुलडाणा) - मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून टाकरखेड ते खैरा या रस्त्याचे काम सुरू असून टाकरखेड गावाजवळील सिमेंट रस्त्याच्या मोरीचे काम हे निकृष्ठ दर्जाचे केले जात असल्याची तक्रार येथीलच पंचायत समिती सदस्या वैशाली जाधव यांनी दि. २० ऑगस्ट ला जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे रा. मा. २७२ खैरा ते टाकरखेड तालुका हद्द रस्ता दर्जोन्नत अंतर्गत ७.२३ कि. मी. अंतराचे हे काम असून त्यात डांबरी रस्ता ६.७५ कि. मी, सिमेंट रस्ता ०.४८ कि. मी, पाईप मोऱ्या १० नग व स्लॅबड्रेन ३ नग चा अंतर्भाव आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून काही मोऱ्याही पूर्णत्वास गेल्या आहेत.

सध्या टाकरखेड गावाजवळील सिमेंट रस्त्याच्या मोरीचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून याकामी बांधकामासाठी वापरण्यात आलेली रेती ही मातीमिश्रित वापरली असल्याची व मोरीच्या पाईपाचे जॉईंटही व्यवस्थित जोडल्या न गेल्याची तक्रार नुकतीच पं. स. सदस्या वैशाली जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टाकरखेड तालुका हद्द ते खैरा असा हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होत असला तरी याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच झाले असून सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा माती भरावाचे कामही व्यवस्थित केले नसल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले असून याकडे वरिष्ठांनी वेळीच दाखल घेऊन झालेल्या कामाची पाहणी करून यासाठी पूर्णा नदीची रेती वापरून ही मोरी पुन्हा करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: The work of Chief Ministers Gram Sadak Yojana is cheap