कामगारांनी रोखला तुमसर-भंडारा राज्यमार्ग

तुमसर : महामार्ग रोखून धरताना संतप्त कामगार.
तुमसर : महामार्ग रोखून धरताना संतप्त कामगार.

तुमसर (भंडारा) : नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सुरक्षा व आवश्‍यक साहित्याची किट असलेली पेटी वाटप केली जात आहे. दोन दिवसांपासून प्रतीक्षा करूनही किट न मिळाल्याने आज तुमसर शहरात संयम सुटलेल्या कामगारांनी बाजार समिती समोर काही वेळ भंडारा-तुमसर राज्यमहामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने कामगार शांत झाले.
महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांना सुरक्षा साहित्य असलेल्या किटचे वाटप केले जात आहे.
किटवाटपाचे काम एका खासगी कंपनीला आहे. आचारसहिंता तोंडावर असल्याने ही कंपनी आपल्या सोयीनुसार ट्रकद्वारे नियोजित ठिकाणी पेट्या पोहोचून वाटप करते. दोन दिवसांपासून नोंदणीकृत बांधकाम कामगार किट मिळवण्यासाठी उन्ह, पावसात रांगेत ताटकळत उभे राहत आहेत.
रांगेत लागूनही कामगारांना पेटीविना आल्या पावली परतावे लागत असल्याने येथील कामगार संतप्त झाले. सध्या मोहाडी व तुमसर तालुका मिळून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किट वाटप केले जात आहे. दोन तालूक्‍यात पन्नासहजाराहून अधिक कामगारांनी नोंदणी केली असली तरी यात अनेक बोगस कामगार असल्याची माहिती आहे.
महिला-पूरुष कामगार पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत रांगेत ताटकळत उभे राहतात तर काही कामगारांनी बाजार समितीच्या मार्केट यार्डमधील धान्याचा पोत्यावर रात्र जागून काढल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे येथे शेकडो महिला-पुरुष कामगारांचा सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होत असून कामगारांची गैरसोय होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com