सुरक्षेची हमी कोण घेणार; कामगारांची सुरक्षा धोक्‍यात 

दिलीप गजभिये
सोमवार, 16 डिसेंबर 2019

याठिकाणी यापूर्वीदेखील अपघात झाले आहेत. हे कामगार व मशिनरीचे वदर्ळीचे ठिकाण असल्याने या ठिकाणी सुरक्षारक्षकांची तैनाती आवश्‍यक आहे. मात्र, येथे नेहमीच सुरक्षेच्या बाबतीत ढिल दिली जाते.

खापरखेडा, (जि. नागपूर) : येथील सुपर क्रिटीकल नव्या वीज केंद्रात अपघातचे प्रमाण वाढले आहे. येथे अपघाताच्या घटना नेहमीच्याच झाल्या असून याकडे सुरक्षा विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगार करीत आहेत. यामुळे सुरक्षेची हमी कोण घेणार असाही सवाल केला जात आहे. 

शनिवारी (ता. 14) दुपारी कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीचा डबा ट्रकवर धडकला. सुदैवाने ट्रकचालक काचा फोडून बाहेर निघाल्याने त्याचा जीव वाचला पण तो या अपघातात किरकोळ जखमी झाला. याठिकाणी यापूर्वीदेखील अपघात झाले आहेत. हे कामगार व मशिनरीचे वदर्ळीचे ठिकाण असल्याने या ठिकाणी सुरक्षारक्षकांची तैनाती आवश्‍यक आहे. मात्र, येथे नेहमीच सुरक्षेच्या बाबतीत ढिल दिली जाते. मागील एका वर्षात येथे चार जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय दैनंदिन किरकोळ अपघात होत असल्याचेही कामगार सांगतात. 

हेही वाचा : जिल्हा परिषद निवडणुकीचा सोमवारी फैसला

सुरक्षारक्षकांची अरेरावी

सुरक्षेच्याबाबतीत येथे असलेली यंत्रणा निकामी असल्याचे चित्र एका चोरट्याच्या मृत्यूने उघड झाले होते. तीन दिवस मृतदेह एकाच ठिकाणी पडून असतानाही सुरक्षा यंत्रणेला त्याची भनक लागली नव्हती. सद्यस्थितीत सुरक्षा विभाग वेगवेगळे नियम वीज केंद्रात लागू करीत आहे. फक्त मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांचा जमावडा दिसून येतो. याशिवाय विविध ठिकाणावरील पॉइंटवरसुद्धा सुरक्षारक्षक असूनही विविध घटना घडत आहेत. अनेक घटना उघडकीस येत नसल्याचेही कामगार सांगतात. सुरक्षारक्षकांची अरेरावी करीत कामगारांवर दमदाटी करतात असेही मत व्यक्त केले. 

हेही वाचा : सेवानिवृत्त कर्नल अडकले फेक जाहिरातीच्या जाळयात

बोलण्यास टाळाटाळ

वीज केंद्रात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्व देणे अपेक्षित आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच अशा घटना घडत आहेत. याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. कार्यालयात येऊनच सर्व माहिती घ्यावी असेही ते म्हणाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers' safety hazard at Khaparkheda power station