एकदिलाने काम करणे राष्ट्रसंतांची शिकवण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नागपूर : लहान-मोठा, शिक्षित-अशिक्षित आणि कुठलाही जातिभेद न पाळता "हैं सत्य मेरा लक्ष्य' या भावनेने एकदिलाने काम करणे हीच राष्ट्रसंतांची शिकवण होती, असे प्रतिपादन सप्तखंजिरीवादक इंजिनिअर भाऊसाहेब थुटे यांनी शुक्रवारी केले.

नागपूर : लहान-मोठा, शिक्षित-अशिक्षित आणि कुठलाही जातिभेद न पाळता "हैं सत्य मेरा लक्ष्य' या भावनेने एकदिलाने काम करणे हीच राष्ट्रसंतांची शिकवण होती, असे प्रतिपादन सप्तखंजिरीवादक इंजिनिअर भाऊसाहेब थुटे यांनी शुक्रवारी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 51 व्या पुण्यतिथीनिमित्त दीक्षान्त सभागृहात आयोजित "राष्ट्रसंतांच्या विचाराची समर्पकता : आजच्या संदर्भात' या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. थुटे म्हणाले, राष्ट्रसंतांचे ध्येय माणूस निर्माणाचे होते. त्यांनी मानवता धर्माचा सतत उद्‌घोष केला. आत्मप्रत्ययातून त्यांचे विचार व साहित्य जन्माला आले. त्यामुळे त्यात समाजाच्या सुखदु:खावरचा उताराही सापडतो. ते विचार आजच्या युगातही सातत्याने वाढत जाणारे आहेत. ग्रामगीतेत उत्तम आणि निकोप गावाची संकल्पना त्यांनी मांडली. ग्रामगीता ही सांगणे आणि ऐकण्याची पोथी नसून तो प्रत्यक्ष आचरणाचा ग्रंथ आहे. "जब किसानों की देखी भलाई, तब मैने खुशी मनाई' म्हणणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कष्टकऱ्यांच्या सुखदु:खात स्वत:ला बघतात. त्यांना सावध राहण्याचाही इशारा देतात. व्यवसाधीनतेपासून, अंधश्रद्धेपासून, धार्मिक अवडंबरापासून सावध राहण्याचा उपदेश देतात. ते मानवतेचे खरे मार्गदर्शक असल्याचे ते म्हणाले.
प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी संत-महात्म्यांच्या विचाराच्या आदानप्रदानाने मन संस्कारित होत असल्याचे सांगितले. त्यातून जटिल प्रश्‍नांची उत्तरे मिळत असून त्या साहित्याने आध्यात्मिक लोकशाही मिळाली असल्याचे ते म्हणाले. व्याख्यानापूर्वी श्री गुरुदेव मानससेवा छात्रालयाच्या चमूने "स्वर-गुरुकुंजाचे' हा राष्ट्रसंतांच्या भजनावर आधारित "भजन प्रभात' कार्यक्रम सादर केला. अमोल बांबल यांनी भजनवृंदाचे संयोजन केले. तत्पूर्वी, विद्यापीठ परिसरात असलेल्या राष्ट्रसंतांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ. देशपांडे यांनी अभिवादन केले.
कार्यक्रमात प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. राजेश सिंग उपस्थित होते.
संमेलनाध्यक्ष झाले स्वच्छतादूत
या कार्यक्रमानंतर चर्चा करत असताना थुटे यांनी एक त्यांची आठवण सांगितली. भिसी येथे राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली असताना, ते भिसी येथे गेले. त्यावेळी एका चौकात खूपच अस्वच्छता दिसली. त्यांनी याबाबत विचारले तेव्हा, "याला भट्टी चौक म्हणतात. येथे दारू काढली जाते', असे सांगण्यात आले. त्यावर ते खूप अस्वस्थ झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून निवडक गुरुदेव भक्तांना घेत त्यांनी चौकाची स्वच्छता आरंभली. मग गावकरीही जमले. तो चौक चकचकीत झाला. त्याचे नाव भट्टी चौक बदलून "गुरुदेव चौक' झाले. आपल्या कृतीतून राष्ट्रसंतांचे विचार कसे रुजविता येतात, याचा स्वानुभवच थुटे यांनी कथन केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Working together to teach the nations