जागतिक हवामान दिवस : तापमानवाढ उठणार मानवाच्या अस्तित्वावर! ग्लोबल वॉर्मिंगचा फटका

World Climate Day Global Warming Will Raise Human Existence
World Climate Day Global Warming Will Raise Human Existence

नागपूर : धरतीचे (वायुमंडळ) वाढते तापमान हे मानवी जीवनासाठी धोक्‍याची घंटा मानले जात आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास परिस्थिती आटोक्‍याबाहेर जाऊ शकते, असा गर्भित इशारा हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे. तापमानवृद्धीस कारणीभूत गोष्टी टाळून कठोर उपाययोजना केल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते, असे त्यांचे मत आहे.

काही वर्षांपासून जग ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रभावाखाली वावरते आहे. आधुनिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे धरतीचे तापमान अर्ध्या ते एका अंशाने वाढल्याने यंदाही अधिक तापमान राहील, असा जागतिक पातळीवर अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. वाढत्या तापमानाचा फटका विदर्भालाही बसतो आहे. गेल्या दशकातील विदर्भातील हवामानाचा अभ्यास केल्यास परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे लक्षात येते.

विदर्भातील तापमानात सातत्याने वाढ होत असून, पाऱ्याने अनेकवेळा सत्तेचाळिशी ओलांडली आहे. राज्यातील इतरही शहरांची जवळपास हीच स्थिती आहे. हा ‘ट्रेंड’ लक्षात घेता यंदाही विदर्भ व महाराष्ट्राला उन्हाचा जबर तडाखा बसण्याची दाट शक्‍यता आहे. फेब्रुवारी-मार्चमधील तापमानाने ते संकेत दिले आहे. 

हवामानशास्त्रज्ञांनुसार, तापमानवृद्धीला मुळात मानवनिर्मित कारणे दोषी आहेत. आधुनिकीकरणाच्या नावाखाली जागोजागी उद्योग उभारले जात आहेत. त्याद्वारे निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइडमुळे तापमानात वाढ होत आहे. याशिवाय ग्रामीण भागातून शहराकडे येणारे लोकांचे लोंढेही कारणीभूत आहेत. शहरांमध्ये जागोजागी मोठमोठ्या इमारती व अपार्टमेंट्स उभारले जात आहेत. वृक्षतोडदेखील तापमानवृद्धीचे आणखी एक कारण आहे.

‘ग्रीन हाउस इफेक्‍ट’ तसेच ओझोन पडद्याला जागोजागी छिद्रे पडत चालल्यामुळे त्यातून येणाऱ्या अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे तापमानात वाढ होत आहे. परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेलेली नाही. मनुष्याने निसर्गाला थोडे गांभीर्याने घेऊन जीवनात बदल केल्यास यावर मात करता येऊ शकते.

वृक्षारोपणासोबतच सौरऊर्जा व परमाणू ऊर्जेचा अधिकाधिक वापर, वाहनांचा कमीतकमी उपयोग आणि सिमेंटच्या घरांऐवजी गारवा देणारी कवेलूची साधी घरे बांधणे त्यावरील काही प्रमुख उपाययोजना आहेत. यासंदर्भात जनजागृतीसोबतच कठोर पावले उचलणे काळाची गरज आहे. 

तापमानवाढीची कारणे 

  • कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन 
  • दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढती संख्या 
  • औद्योगिक प्रदूषण 
  • झाडांची भरमसाट कत्तल 
  • सिमेंटच्या जंगलाचे वाढते प्रमाण 

उपाययोजना 

  • वृक्षोरापणावर भर 
  • खासगी वाहनांचा कमीतकमी वापर 
  • सौरऊर्जेवर अधिकाधिक जोर 
  • सिमेंटच्या घरांऐवजी कवेलूची घरे बांधणे

मागील दशकात विदर्भातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

वर्ष शहर तापमान
२०११ वर्धा ४५.२
२०१२ ब्रह्मपुरी ४७.६
२०१३ यवतमाळ ४८.० 
२०१४ चंद्रपूर ४६.६
२०१५ चंद्रपूर ४७.६
२०१६ अकोला ४७.१
२०१७ चंद्रपूर ४७.२
२०१८ चंद्रपूर ४७.९
२०१९ चंद्रपूर ४८.०
२०२० अकोला ४७.४

परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते
ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गचक्र बदलल्याने वेळीअवेळी पाऊस, ओला किंवा सुका दुष्काळ, तीव्र थंडी आणि कडक उन्हाळा यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मानवाने वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. 
- एम. एल. साहू,
संचालक, प्रादेशिक हवामान विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com