जागतिक मधमाशी दिन : मधमाशी कृषी क्षेत्राचा अविभाज्य घटक; संगोपन कसे होते, किती आहेत प्रकार?...वाचा

दत्ता महल्ले
बुधवार, 20 मे 2020

कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढीसाठी नवनवीन संशोधने केली जात आहेत. त्यामुळे मर्यादीत कृषी क्षेत्रातूनही वाढत्या लोकसंख्येच्या पोटात सुखाचा घास जात आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढीमध्ये मधमाशीचे योगदान देखील मोलाचे आहे.

वाशीम : शेतातील पिकांच्या फुलांवर मध गोळा करत फिरणारी मधमशी दिवसभरात अगणित फुलांचे परागीकरण घडवून आणते. त्यामुळे फलधारण क्षमता वाढून उत्पादनात वाढ होते. मात्र, सध्या कृषी क्षेत्रात प्रचलीत होत असलेली एकपीक पद्धती, किटकनाशकांचा वापर, बीटी कॉटनचा वाढता पेरा मधमासांसाठी मारक ठरत आहे.

कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढीसाठी नवनवीन संशोधने केली जात आहेत. त्यामुळे मर्यादीत कृषी क्षेत्रातूनही वाढत्या लोकसंख्येच्या पोटात सुखाचा घास जात आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढीमध्ये मधमाशीचे योगदान देखील मोलाचे आहे. हंगामानुसार शेतात येणार्‍या पिकांच्या फुलांवर मधगोळा करत फिरणारी मधमाशी दिवसभरात असंख्य फुलांवर बसते.

हेही वाचा - हृदयद्रावक! सुखी संसार अचानक विस्कटला अन् विवाहितेसह दोन चिमुकल्यांनी विहिरीत...

सोबतच आपल्या पायांना टिकटलेल्या परागकणांद्वारे परागीभवन घडवून आणते. त्यामुळे कृषी क्षेत्रात मधमाशांच्या अस्तित्वामुळे 27 टक्क्यांपासून ते 127 टक्क्यांपर्यंत उत्पादकता वाढ शक्य होऊ शकते, असे मत वर्धा येथील मधमाशी विकास केंद्राचे संचालक डॉ. गोपाल पालीवाल यांनी व्यक्त केले आहे.

मधमाशा किती प्रकारच्या आहेत?
भारतात प्रामुख्याने चार प्रकारच्या मधमाशा आढळतात. यामध्ये आगेमोहळ, विदेशी सातपुडा, देशी सातपुडा व फुलोरी मधमाशा यांचा समावेश आहे. मधमाशांची प्रथम भूमिका ही परागीकरणाची असून, मध, मेण व इतर पदार्थ हे दुय्यम घटक आहेत.

आवश्यक वाचा - Video : अखेर पोलिसांनी डागली कारवाई तोफ, बेकायदेशीर सुरू होता हा व्यवसाय

सातपुडा मधमाशांचे संगोपन कसे होते?
देशी व विदेशी सातपुडा मधमाशांचे संगोपन लाकडी पेट्यांद्वारे केल्या जाते. या मधमाशांपासून मिळणारे मध व मेण व्यावसायिक दृष्टीकोणातून घेतल्या जाते. त्यामुळे याचा विविध ठिकाणी उपयोग होतो. त्यामुळे दिवसेंदिवस मधुमक्षिका पालन वाढत आहे.

आदिवासी बांधवांना प्रशिक्षणाची गरज
आगे मोहळ व फुलोरी मधमाशा ह्या चावतात. त्यामुळे त्यांना पारंपारिक पद्धतीने किंवा विध्वंसक पद्धतीने हाताळून मध वेगळे केले जाते. मात्र, यामध्ये मधमाशांसह घरट्यांचे देखील नुकसान होते. याकरिता आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

जंगलातील मधात उच्च कोटीची गुणवत्ता
जंगलात उत्पादीत होणारे मध हे 100 टक्के शुद्ध असते. कारण, यामध्ये जंगलातील आवळा, बेहडा, करंज, कडूलिंब, पळस, काटेसावर, आंजन, जोतपुडा, कुकुरांजी, जांभूळ, निलगीरी, निरगुडी आदी नानाविध जंगली वनस्पतींपासून विविध औषधीयुक्त गुणांनी मिळून मध तयार होते. त्यामुळे या मधाची गुणवत्ता उच्च कोटीची असते.

मधामध्ये कोणते गुणधर्म असतात?
मध हे अ‍ॅन्टी बॅक्टेरियल, अ‍ॅन्टी बायोटिक, अ‍ॅन्टी व्हायरल गुणांनी युक्त असते. त्यामुळे मधाचे सेवन रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी फार लाभकारी आहे.

या पिकांच्या उत्पादकतेत होते वाढ?

  • तेलवर्गीय पिके : सूर्यफूल, तीळ, जवस, सोयाबीन आदीं
  • मसालेवर्गीय पिके : धने, सोप, ओवा, मिरची
  • डाळवर्गीय पिके : तूर, हरभरा, मूग, उडिद, मसूर आदी
  • फळवर्गीय पिके : डाळिंब, चिकू, पेरू, बोरं, जांभळं, आंबा, सफरचंद, आवळा, लिची आदी
  • वेलवर्गीय पिके : काकडी, कोहळा, कारले, दोडके आदी
  • भाज्यांमध्ये : वांगे, करवंद आदी
  • कांदा : बिजोत्पादन घेणार्‍या कांद्याकरिता
  • लिंबू वर्गीय पिके : संत्रा, लिंबू, मोसंबी
  • प्रमुख पिके : ज्वारी, मका, तांदूळ, कपाशी आदी.

मधाबद्दल हे माहित आहे काय?
पिवळ्या फुलांपासून निर्मित मधाचे कालांतराने खडे तयार होतात. पांढर्‍या व जांभळ्या फुलांपासून तयार झालेले मध घट्ट न होता जशाच तशेच राहते. तर आगे मोहळापासून तयार झालेल्या मधात मोठ्या प्रमाणावर खनिजे असतात.

कृषी क्षेत्रात मधमाशांमुळे उत्पादकता वाढ होऊ शकते
मधमाशीचे मुख्य कार्य हे परागीकरण असून, मध, मेण व इतर पदार्थ दुय्यम आहेत. कृषी क्षेत्रात मधमाशांमुळे 27 टक्क्यांपासून तर 227 टक्क्यांपर्यंत उत्पादकता वाढ होऊ शकते. मात्र, किटकनाशकांचा वापर, एक पीक पद्धती, बीटी कॉटन, एचटी कॉटन आदींमुळे मधमाशांची संख्या झपाट्याने घटत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बहुपीक पद्धती अवलंबिल्यास निश्‍चितच उत्पादन वाढून, मधमाशांना देखील पोषक वातावरण तयार होईल.
-डॉ. गोपाल पालीवाल, संचालक, मधमाशी विकास केंद्र वर्धा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World honeybee Day : honeybee is an integral part of agriculture in washim district