‘दिव्यांग’चिमुकल्यास दत्तक घेणारी माय 

रविवार, 13 मे 2018

विक्रांत काहीही करु शकत नव्हता. केवळ शून्यात बघत होता. मात्र हळूहळू ही धारणा दूर होत आहे. त्याच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होत आहे. विक्रांतमधील सुप्त गुण ओळखून त्याला सामान्याप्रमाणे जगवणार आहे.  
-विद्या रंगारी  

नागपूर - मानसिक विकलांग मुलांना बघितले की, केवळ ‘दये’चे भाव मनात येतात. अशा मुलाच्या डोळ्यात स्वप्न नसतात.  शारिरीक व मानसिक क्षमतेत, मर्यादेत अडकली असतात, असा मानसिक आजार घेऊन जन्माला येणाऱ्यांना कोणीही दत्तक घेत नाही. परंतु या असहाय मुलाची ‘आई’ बनण्यासाठी ती माता पुढे आली. नियतीने हिरावून घेतलेले त्या मुलाचे बालमन समजुन घेत त्याला आधार देण्यासाठी त्याला दत्तक घेतले. त्याच्या आयुष्याला आकार देत स्वावलंबी बनवण्याचा संकल्प केला आहे. त्या मातेचे नाव विद्या रंगारी. मुळची नागपूरची. विशेष असे की, ही माता बॅंकेत अधिकारीपदावर कार्यरत आहे. या मातेने आपल्या दत्तक लेकराला ‘विक्रांत विद्या रंगारी’ असे नाव दिले आहे. 

घरात नवं बाळ येणार, अशी कुणकूण लागली, की सारं घर आनंदानं वेडावून जातं. बाळाच्या येण्यापुर्वीच कौतुकाचे सोहळे सुरू होतात. डोहाळजेवणं होतात. बाळाच्या आईला हवं-नको पाहिलं जातं. घरात जणू ‘आनंदाचा ठेवा’ तयार होतो. बाबांपासून ते पार आजोबांपर्यंत साऱ्यांची धावपळ सुरू होते. मात्र गर्भातील बाळ मानसिक व्यंग घेऊन जन्माला येणार असल्याचे कळताच त्या मातेच्या डोक्‍यावर डोंगर कोसळतो. हीच अवस्था त्या धुणीभांडी करणाऱ्या मातेची झाली. बाळ महिनाभरात जन्माला येईल, या भितीने ती माता कासाविक झाली. अशा वेळी त्या महिलेला आधार देण्यासाठी विद्या रंगारी पुढे आल्या. दोन वर्षांपुर्वी त्या धुणीभांडी करणाऱ्या मातेला आधार देत त्यांचं डाऊन सिंड्रोम असलेले बाळ दत्तक घेतले. ‘दिव्यांग’ बाळाला दत्तक घेणारी ही पहिलीच माय असावी. केवळ जन्म देणारी हीच आई नसते, तर जन्मभर सांभाळ करणारीही आईच असते, म्हणूनच कृष्णाला जन्म देणाऱ्या देवकीपेक्षा त्याचे पालनपोषण करणारी मावशी यशोदा श्रेष्ठ ठरत असल्याची भावना आपोआपच मनात येते. याच भावनेतून या मातेच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आपोआपच हात वर जातात.  

‘डाऊन सिंन्ड्रोम’ असा आजार जडलेल्या विक्रांतवर संस्कार करण्याठी पहाटेपासूनच रंगारी यांचा दिवस सुरू होतो. त्याला स्वतःचे नैसर्गिक व्यवहारही कळत नाही. अशा विक्रांतचे बालमन समजून घेत बॅंकेत जाण्यापुर्वी आणि घरी आल्यानंतर ती संपूर्ण वेळ विक्रांतसोबत घालवते. विक्रांतवर न्युरो डेव्हलपमेंट थेरपी, स्पीच थेरपी, ॲक्‍टीव्हिटीज, स्पेशल एज्युकेशन अशा उपाययोजनेतून स्वतःच्या पायावर उभे करण्याचा या मातेचे प्रयत्न सुरू असून यात यश येत असल्याचे ही माता आनंदाने सांगते.   

Web Title: World Mother Day vidya rangari story