दारूबंदी जिल्ह्यासाठी तस्करीचे केंद्र यवतमाळ; परराज्यांतून दारूची आयात; म्होरक्‍यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान

राजकुमार भितकर  
Sunday, 13 September 2020

रियाणासारख्या दूर प्रदेशातून दहाचाकी ट्रकमध्ये तब्बल शंभर पेटी दारूसाठा भरून येत असताना कुठेही आत नेमके काय आहे, याची तपासणी करण्यात आली नाही, हे एक आश्‍चर्यच आहे.

यवतमाळ : केवळ हरियाणात विक्रीस मान्यता असलेली दारू यवतमाळात पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. येथून दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात तस्करी केली जाते. यवतमाळ हे तस्करांसाठी सुरक्षित केंद्र ठरत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून तस्करांचा मनसुबा उधळून लावला. मात्र, म्होरक्‍यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान कायम आहे.

हरियाणासारख्या दूर प्रदेशातून दहाचाकी ट्रकमध्ये तब्बल शंभर पेटी दारूसाठा भरून येत असताना कुठेही आत नेमके काय आहे, याची तपासणी करण्यात आली नाही, हे एक आश्‍चर्यच आहे. दारूतस्करीत हरियाना ते यवतमाळ हे नवीन कनेक्‍शन समोर आले आहे.

हेही वाचा - कंगणाला मिळालेली Y+ सुरक्षा असते तरी काय? Z+, Z, Y आणि X श्रेणीची सुरक्षा कुणाला कधी मिळते? वाचा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने विनोदकुमार राजपूत (वय 32, रा. खाकाबाग, जि. इटावा (उत्तर प्रदेश)), दिनेश येंडाळे (वय 29, रा. नालवाडी, वर्धा), निकेत पडडाखे (वय 30, रा. रामनगर, वर्धा), नितीन कळंबकर (वय 30, रा. स्टेशन फैल, वर्धा), सतीश येंडाळे (वय 26, शिवनी, जि. अकोला), अमोल कांबळे (वय 24, रा. चंदननगर, नागपूर) यांना अटक केली. म्होरक्‍के कोण हे पुढे आले नाही. अनेकदा तपासात राजकीय दबाव येतो. त्यामुळे अडचणी येतात व मुख्य विषय बाजूला पडतो. कालच्या कारवाईत राजकीय दबाव आल्याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरू आहे.

"आयबी' या विदेशी मद्याला केवळ हरियानात विक्री करण्यात मान्यता आहे. तसे बॉटलवर स्पष्ट नमूद आहे. तरीदेखील ट्रकमध्ये तब्बल शंभर पेटी दारू भरून त्या यवतमाळात आणण्यात आल्या. डोर्ली येथील सुरक्षित स्थळावरून एक कार व पीकअप वाहनात हा माल भरणे सुरू असताना एक्‍साईजच्या पथकाला टीप मिळाली. 

त्यावरून त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. यावेळी सहाही जण ट्रकमधून दुसऱ्या वाहनात दारू भरत असताना मिळून आलेत. एकूण 29 लाख 95 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही दारू यवतमाळ येथून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात जाणार होती. यापूर्वीदेखील अनेकदा सुरक्षित खेपी पोहोचल्या असतील. त्यामुळे यात यवतमाळातील लिकर लॉबीतील व्यक्तीचा सहभाग असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा हात म्होरक्‍यापर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे.

मार्बल पावडर वाहतुकीचा बनाव

दहाचाकी ट्रकमध्ये विदेशी दारू आणत असताना कुणालाही संशय येऊ नये, म्हणून मार्बल पावडरदेखील भरण्यात आला होता. हरियाणातून निघालेला ट्रक सुरक्षित यवतमाळपर्यंत पोहोचला. मात्र, वर्धेत नेण्यासाठी दारू भरत असताना तस्करीचा पर्दाफाश झाला. दारूतस्करी करताना नवनवीन प्रयोग केले जातात, हे यापूर्वीदेखील उघड झाले आहे.

क्लिक करा - 'ड्रग्स' म्हणजे नक्की असतं तरी काय? काय असतात ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे.. वाचा आणि आपल्या मुलांना असं ठेवा सुरक्षित
 

दारू हरियाणातून आली, हे चौकशीत निष्पन्न झाले. दारूतस्करी करणाऱ्या सहाही आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता, दोन दिवसांची एक्‍साईज कोठडी मिळाली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
- सुरेंद्र मनपीया
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yavatmal is becoming Trafficking center for wine banned district