esakal | अंबर दिव्याच्या गाडीतून उतरलेल्या अधिकाऱ्यातील माणूस बघून ते झाले भावुक...
sakal

बोलून बातमी शोधा

Yavatmal collector help truck drivers

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची तरुण, तडफदार व शिस्तीचे अधिकारी म्हणून सर्वत्र ख्याती आहे. त्यांच्यातील संवेदनशील माणूसही अधूनमधून डोकावत असतो. कधी तो अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतो, तर कधी कुणाला आस्थेने मदत करीत असतो.

अंबर दिव्याच्या गाडीतून उतरलेल्या अधिकाऱ्यातील माणूस बघून ते झाले भावुक...

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : दिवस शनिवार... रात्रीचे दहा वाजले होते... अचानक पाऊसही आला होता. यामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला होता... सर्वत्र अंधार पसरला होता... मात्र, दारव्हा मार्गावर शहराबाहेर दोन ट्रक चालक रस्त्याच्या बाजूला चूल मांडून स्वयंपाक करीत होते... तेवढ्यात अंबर दिव्याची गाडी आली... एक अधिकारी गाडीतून बाहेर निघाला... लॉकडाऊन असल्यामुळे ट्रक चालक घाबरले... अधिकारी थेट ट्रक चालकांकडे गेले अन्‌ आपल्याजवळ असलेले खाण्याचे पदार्थ, जेवणाचे साहित्य व पाण्याच्या बॉटल्स दिल्या... हा अधिकारी कोणी नाही तर यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आहेत... 

यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून एम. देवेंदर सिंह रुजू झाले अन्‌ जोडमोहाजवळ मोठा अपघात झाला. त्यावेळी त्यांनी मध्यरात्री स्वतः रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्त नागरिकांची विचारपूस केली होती. डॉक्‍टरांना योग्य उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. त्यानंतर चिनमधून आलेल्या कोरोना विषाणूचे संकट जिल्ह्यावर आले. तेव्हापासून ते ज्या संयमाने व कुशलतेने परिस्थिती हाताळत आहेत, त्यात त्यांच्यातील कठोर प्रशासक दिसून येतो. ते जेवढे कठोर शिस्तीचे आहेत, तेवढेच संयमी व भावनाप्रधानसुद्धा आहेत. 

अधिक वाचा - मला नकोय बलात्कारातून राहिलेला गर्भ, नागपूर उच्च न्यालायात याचिका

शनिवारी जिल्ह्यात पाऊस झाला. यामुळे रस्त्यावर चिखल झाला होता. तसेच लाईट गेल्याने अंधार झाला होता. यामुळ दोन ट्रक चालक रस्त्याच्या कडेला चूल मांडून स्वयंपाक करीत होते. भुकेने व्याकुळ झाल्याने त्यांनी थेट रस्त्यावरच चूल मांडली होती. याचवेळी अंबर दिव्याची गाडीतून जिल्हाधिकारी जात होते. त्यांना हे ट्रक चालक दिसले. त्यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली. यानंतर ते गाडीतून उतरले आणि ट्रक चालकांकडे गेले. 

ट्रक चालकांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी आपल्याजवळ असलेले खाण्याचे पदार्थ, जेवणाचे साहित्य व पाण्याच्या बॉटल्स दिल्या. तसेस सॅनिटायझर देत कोरोनाचा विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. अंबर दिव्याच्या गाडीतून उतरलेल्या तरुण अधिकऱ्यातील माणूस बघून ते तिघेही भावुक झाले. एका सनदी अधिकऱ्यातील संवेदनशील माणूस भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. 

ट्रक चालक फ्रंटलाइन वॉरिअर्स

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर संचारबंदी लागू केली आहे. परंतु, अत्यावश्‍यक सेवा सुरू आहे. जनतेपर्यंत अन्नधान्य, औषधे व आवश्‍यक सामुग्री पोहोचवली जात आहे. त्यासाठी ट्रक चालक आवश्‍यक सेवा देत आहेत. परंतु, हॉटेल्स, ढाबे बंद असल्याने त्यांना रस्त्याच्या बाजूला ट्रक थांबवून स्वतःच जेवण तयार करावे लागत आहे. प्रतिकुल परिस्थितही ट्रकचालक कर्तव्य पार पाडत आहेत. ते सुद्धा या मोहिमेतील फ्रंटलाइन वॉरिअर्स आहेत.

अधिक वाचा - नवलचं की! महाराष्ट्रातील हा जिल्हा आहे 'कोरोना'मुक्‍त, आढळलाच नाही पॉझिटिव्ह रुग्ण

शिस्तीचे अधिकारी म्हणून ख्याती

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची तरुण, तडफदार व शिस्तीचे अधिकारी म्हणून सर्वत्र ख्याती आहे. त्यांच्यातील संवेदनशील माणूसही अधूनमधून डोकावत असतो. कधी तो अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतो, तर कधी कुणाला आस्थेने मदत करीत असतो. तशी प्रचिती एव्हाना अनेकांना आली आहे.