पती-पत्नीच्या मृत्यूनंतर दगडफेक, जाळपोळ; तीन तास रास्तारोको

संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन केले. एवढ्यावरच गावकरी थांबले नाही, तर जाळपोळ, वाहनांवर दगडफेकदेखील केली
Yavatmal death in accident of husband and wife Stone throwing rasta roko
Yavatmal death in accident of husband and wife Stone throwing rasta roko sakal

यवतमाळ : रस्ता ओलांडताना भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन केले. एवढ्यावरच गावकरी थांबले नाही, तर जाळपोळ, वाहनांवर दगडफेकदेखील केली. ही घटना रविवारी (ता. २४) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भारी विमानतळ परिसरात घडली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल तीन तासांनंतर पोलिसांनी नागरिकांची समजूत काढत रस्ता मोकळा केला. भुतू नागोराव येलकर (वय ५५) आणि सरस्वती भुतू येलकर (वय ५०, रा. जवाहरनगर, मुरझडी) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.

यवतमाळ तालुक्यातील जवाहर नगर मुरझडी येथील भुतू येलकर आणि सरस्वती येलकर दोघेही पती-पत्नी रविवारी रात्री पायदळ नागपूर-तुळजापूर महार्गावर असलेला भारी फाटा ओलांडत होते. यावेळी भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने दोघांना जोरदार धडक दिली. यात दोघांचाही गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती गावात वाऱ्‍यासारखी पसरली. त्यानंतर संतप्त गावकऱ्‍यांनी नागपूर-तुळजापूर महामार्गावर धाव घेत टायर जाळून रास्तारोको आंदोलन केले. वाहनांवर दगडफेक करण्यात आली.

घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, तहसीलदार कुणाल झाल्टे, शहर ठाणेदार बाळकृष्ण जाधव, वाहतूक शाखेतील सहायक पोलिस निरिक्षक संजीव खंदारे यांच्यासह शेकडो अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांची संख्या वाढतच होती.

वाहनचालकाला ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेहाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्‍यांनी घेतली होती.तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलनानंतर पोलिस प्रशासनाने गावकऱ्‍यांची समजूत काढली. त्यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

नागपूर-तुळजापूर महामार्गावर पथदिवेच नाही

नागपूर-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. याचे चौपदरीकरण करण्यात आले. या ठिकाणी रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, जवाहरनगर आणि भारी या मार्गावर पथदिवे नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मार्गावर तातडीने पथदिवे लावण्याची मागणी संतप्त गावकऱ्‍यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com