esakal | यवतमाळ : एकट्यानेच ‘हनी ट्रॅप’साठी रंगविली सारी पात्र
sakal

बोलून बातमी शोधा

money

यवतमाळ : एकट्यानेच ‘हनी ट्रॅप’साठी रंगविली सारी पात्र

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : सोशल मीडियावर तरुणी असल्याचा बनाव निर्माण करून दिल्ली येथील डॉक्टरला तब्बल दोन कोटी रुपयांनी गंडा घातल्याचा पर्दाफास एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने केला. ‘हनी ट्रॅप’साठी एकट्यानेच समर, बहीण, तरुणीची सारे पात्रे रंगविल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. डॉक्टरची गरज ओळखून दोन कोटी रुपयांची वसुली करणारा संदेश मानकर बेड्या पडताच फकीर झाला. एका क्षणात कार, बंगला घेण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. त्याला रविवारी (ता.पाच) येथील न्यायालयापुढे हजर केले असता, येत्या मंगळवारपर्यंत(ता.सात) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यवतमाळ येथील अरुणोदय सोसायटीत राहणारा संदेश हा अतिशय चाणाक्ष आहे. समोरच्या व्यक्तीला नेमके काय हवे, एकूणच माणसाला ‘स्कॅन’करण्यात तरबेज आहे. त्यानुसारच त्याने दिल्लीत वास्तव्यास असलेल्या आंतरराष्ट्रीयस्तरावरील डॉ. रजत गोयल यांना आपल्या जाळ्यात अडकविले. आपण खूब गर्भश्रीमंत आहोत. विदेशात अमाप संपत्ती आहे. डॉक्टरही त्याच्या फेसबूक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटींगला भाळले. दरम्यान, दुबईला लहान बहिणीचे अपरहण झाले आहे, तिला वाचवायचे आहे. दोन कोटींची आवश्यकता आहे, असे खोटे सांगून रक्कमेची मागणी केली. डॉक्टरनेही त्याच्यावर अर्थात अनन्नया ओबेरॉयवर विश्वास ठेवून दोन कोटी रुपये यवतमाळात येऊन ‘समर’च्या हवाली केले.

हेही वाचा: यवतमाळ : ‘त्या’ पाच कुटुंबांचा आधारवडच कोसळला

मात्र, काही दिवसांनी मोबाईल पूर्णत: बंद असल्याने डॉक्टरचा संशय बळावला व यवतमाळात येऊन तक्रार दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिकदृष्ट्या तपास करून अवघ्या काही तासांत संदेश मानकरला बेड्या ठोकल्या. इतकेच नव्हे, तर तब्बल एक कोटी 74 लाखांची रोकड भाड्याने राहत असलेल्या घरातून जप्त केली. सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी व्यक्तीवर त्वरित विश्वास ठेवून त्यांना एन्टरटेन केल्यास किती मोठा गंडा घातला जाऊ शकतो, हे या घटनेने अधोरेखित केले आहे. विशेष म्हणजे हातात कोट्यवधी रुपये आल्यावरही त्याच्या वागणुकीत काहीच फरक पडला नाही. त्याने कुणालाही गंडा घातल्याची साधी भनक लागू दिली नाही. कोट्यावधी रुपयांची माहिती लिक झाली असती, तर त्याचाच गेम झाला असता, अशी भीतीही पोलिस सूत्रांनी वर्तविली. येत्या काही दिवसांत यवतमाळातून रोकड घेऊन पळ काढण्याचा त्याचा प्लॅन होता. मेट्रोसिटीत जाऊन बंगला, कार घेऊन जीवन जगण्याचे स्वप्न तो रंगवीत होता. मात्र, पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने अनेक जण ‘हनी ट्रॅप’पासून वाचले.

80 लाखांचा डाव फसला

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून संदेश मानकर याने मुंबईतील दोघांना अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढले होते. एका जणाला हीच कथा सांगून 80 लाख रुपयांची मागणी केली होती. नांदेडमार्गे पैसा घेऊन येत असताना सदर व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आला आणि त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. त्यामुळे संदेशला 80 लाख रुपये मिळू शकले नाही. तर, मुंबईतील एका व्यक्तीकडून दहा हजार रुपये उकळण्यात त्याला यश आले. येथूनच ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून पैसे कमविण्याचा हव्यास वाढत गेला. अशा प्रकरणात आरोपी व रोकड जप्तीची देशभरातील ही पहिलीच कारवाई मानली जात आहे.

loading image
go to top