क्षुल्लक कारणातून पती बनला हैवान...मग उचलले हे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

पती-पत्नीमध्ये वादाची ठिणकी उठणे हे नित्याचेच झाले आहे. मात्र पांढरकवडा तालुक्‍यातील बोथ येथे एक पतीने पत्नीचा निर्घृण खून केला. त्यानंतर पतीनेही झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. 15) शेतातच घडली. या घटनेमुळे त्यांची मुले पोरकी झाली आहेत.

पहापळ (जि. यवतमाळ) : कौटुंबिक कारणातून वाद झाल्याने पत्नीचा खून करून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पांढरकवडा तालुक्‍यातील बोथ शिवारात शुक्रवारी (ता. 15) उघडकीस आली. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. गुरुदास नारायण मेश्राम (वय 35, रा. बोथ), सुरेखा गुरुदास मेश्राम (वय 30), अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.

पहापळ येथून जवळच असलेल्या बोथ या गावातील शेतकरी गुरुदास मेश्राम याने पत्नी सुरेखाचा कौटुंबिक वादातून शेतातच खून केला. त्यानंतर जवळच असलेल्या झाडाला त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

शेतातच पत्नीचा केला खून

दोघेही शेतातील कामाकरिता शेतात गेल्यानंतर त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद निर्माण झाला. रागाच्या भरात गुरुदास याने पत्नी सुरेखा हिच्यावर काठीने वार करून तिला गंभीर जखमी केले. या मारहाणीत तिचा जागेवरच मृत्यू झाला. त्यामुले घाबरलेल्या पतीने अवघ्या काही वेळातच शेजारीच असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

जाणून घ्या : क्षणिक सुखासाठी विवाहित महिला-पुरुष ठेवतात विवाहबाह्य संबंध अन्‌ विस्कटते संसाराची घडी

मुले झाली पोरकी

ही घटना गावात समजताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. या घटनेची माहिती पांढरकवडा पोलिस ठाण्यात देण्यात आली. मृतांच्या पश्‍चात दोन मुले आहेत. पती-पत्नीच्या मृत्यूमुळे त्यांची मुले पोरकी झाली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पांढरकवडा ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal husband murderd wife