तहानलेल्या पाखरांसाठी मी तर पाणी ठेवले, तुम्ही ठेवले की नाही?

yavatmal man
yavatmal man

पुसद (जि. यवतमाळ)  : कोरोनामुळे घरादारात शांतता पसरली आहे.  माणसे घरात बंदिस्त झाल्याने काहीशी मानसिक स्थिती दोलायमान झाली आहे. या एकांतवासातून सावरण्यासाठी
"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती
येणे सुखे रुचे एकांताचा वास"
हा संत तुकारामांचा अभंग निश्‍चितच प्रेरणादायी ठरतो. चैतन्याचा अनुभव घ्यायचा असेल तर किमान अंगणातील निसर्गाला तरी साद घातली पाहिजे. हाच दृष्टिकोन मनात ठेवून काही पक्षीप्रेमी, पर्यावरण मित्र उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांची काळजी घेत आहेत.
एप्रिलच्या मध्यापासून सूर्य आपले प्रखर रूप दररोज नव्याने घेऊन येत आहे. उन्हाच्या कडाक्‍यात माणसाच्या घशाला कोरड पडत आहे. अशावेळी घराच्या अंगणातील झाडांवरील पक्षी तहानेने व्याकूळ होतात. पिण्याचे पाणी न मिळाल्याने त्यांना ग्लानी येते व बरेचदा  निर्जलीकरणाने प्राणपाखरू उडून जाते. अशा स्थितीत संवेदनशील मनाच्या पर्यावरण प्रेमींनी पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी आपले पाऊल पुढे टाकले नाही तरच नवल.

पुसद तालुक्‍यातील रोहडा येथील कृषी मित्र शिवाजी गुंजकर हा युवक उन्हाळ्यात पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून पाणीपात्र तयार करण्याचा उपक्रम राबवित आहे. भाजलेल्या मातीपासून बनवलेले हे पात्र रोहडा गावातील घरोघरी तो वाटतो. घराच्या अंगणातील झाडाला हे पाणीपात्र दोरीच्या साह्याने बांधून देतो व शक्‍यतोवर दररोज पाण्याने पात्र तुडुंब भरतो. हे काम तो आवडीने करत असल्याने गावकऱ्यांना त्याच्या या कार्याचे कौतुक वाटते. साहजिकच गावकऱ्यांनाही प्रेरणा मिळत असल्याने पुढे गावकरी त्याचा हा उपक्रम आनंदाने सुरू ठेवतात.

लॉकडाऊनच्या काळात सगळे जग ठप्प असताना शिवाजी मात्र पाणीपात्र घेऊन घरोघरी अंगणातील झाडांना बांधत असतो. पात्रात पाणी घालत असतो. तहानलेले पक्षी मग तृषातृप्ती करीत आनंदाने गुंजन करतात. पक्ष्यांचा किलबिलाट, त्यांची मंजूळ गाणी कोरोनाच्या  शांततेत ऐकताना कान तृप्त होतात आणि मनावरील दडपण काहीसे हलके होते. लॉकडाऊनमुळे बाहेरचा गजबजाट संपला आहे. अशावेळी शांत-निरव वातावरणात पक्षांची किलबिल कानांना सुखावते आहे. साहजिकच अवतीभवतीच्या वृक्षवल्ली व पक्षी यांच्याशी नव्याने नाते जुळले गेले आहे. पर्यावरण प्रेमाचा संस्कार कोरोनाने मानवी मनावर कोरला आहे. या जागरूकतेतून घरोघरी पक्षांसाठी चारा-पाणी ठेवले जात आहे. शिवाजीसारखे  पक्षीमित्र निसर्गातील आनंद लुटण्यासाठी पुढे येत आहेत.

 सविस्तर वाचा - त्या पाच भावंडांना अखेर मिळाला मायेचा आधार

परिसर बहरला कडूलिंबाने
मुळात कृषी मित्र असलेल्या शिवाजी गुंजकरने
रोहडा गावाच्या परिसरात कडूलिंबाच्या झाडांचे मोठ्या प्रमाणावर संगोपन केले आहे. त्यामुळे हा परिसर कडूलिंबाने बहरला आहे. घरोघरी अंगणात पाणीपात्र ठेवताना शिवाजी जंगलातील झाडांवरही पाणीपात्र बांधून पक्ष्यांची तहान भागवतो. वृक्ष संवर्धनासाठी शिवाजीने वृक्ष रक्षा सेवा संघ स्थापन केला आहे. 'कृषी मित्र'सोबत शिवाजीची ओळख आता 'पक्षीमित्र' अशी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com