मजुराला विषबाधा, शेतमालकास नोटीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

वणी (जि. यवतमाळ) : पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना शेतमजुरास विषबाधा झाल्यामुळे येथील तहसीलदार रवींद्र जोगी यांनी मंगळवारी (ता. 28) शेतमालकास कारवाईची नोटीस बजावली आहे. राज्य सरकारने शेतमजुरांच्या विषबाधेस शेतमालकांना जबाबदार धरले जाईल, असे परिपत्रक काढल्यानंतर अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच कारवाई ठरली आहे. या कारवाईमुळे शेतकरी दडपणात आले आहेत.

तालुक्‍यातील तेजापूर येथील शेतमजूर अंकुश बंडू भोयर (30) याला विषबाधा झाली. ते विजय मालेकार यांच्या शेतात कीटकनाशक फवारणीसाठी गेले होते. परंतु, शेतमालकाने त्यांना कोणतेही संरक्षक साहित्य पुरविले नाही. त्यामुळे विषबाधा झाली. प्रकरण अंगलट येईल म्हणून ज्या दुकानातून कीटकनाशक घेतले होते, त्या कृषिमाल विक्रेत्याच्या मध्यस्थीने एका खासगी रुग्णालयात अंकुशवर उपचार करण्यात आला. प्रकरण मिटविण्याचाही प्रयत्न झाला.
ही बाब कृषी विभागाच्या लक्षात आल्यावर प्रकरण तहसीलदारांकडे गेले. त्यामुळे शेतमालकास नोटीस बजावण्यात आली असून दोन दिवसांत खुलासा मागितला आहे. वापरलेले कीटकनाशक जास्त तीव्रतेचे होते, ते अनधिकृत असण्याची शक्‍यता आहे, जहाल कीटकनाशक फवारताना शेतमजुरास संरक्षित साहित्य पुरविले नाही, त्यामुळे संबंधित मजुरास विषबाधा होण्यास शेतमालकांना जबाबदार का धरले जाऊ नये, अशी विचारणा या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
विषबाधेचा मागील वर्षीचा अनुभव पाहता यावर्षी महसूल व कृषी विभाग गावपातळीवर सभा घेत आहे. फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रशिक्षण देत आहेत. मात्र, काही अपवाद वगळता बहुसंख्य शेतकरी व शेतमजूर काळजी घेताना दिसत नाही.

Web Title: yavatmal news