महागाव येथील सराफ व्यावसायिकाचे अपहरण; पंढरपूरमध्ये गुन्हा दाखल

ज्ञानेश्वर ठाकरे
बुधवार, 10 जानेवारी 2018

महागाव (यवतमाळ): महागाव येथील सोन्या-चांदीचे दागिने घडविणाऱ्या सराफा व्यवसायीकाचे किनवट तालुक्यातील मांडवी येथून अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना ६ जानेवारी रोजी घडली. दीपक हनुमंत जरे (२२) असे सराफा व्यवसायीकाचे नाव असून महागाव येथे त्यांचे दागिणे तयार करण्याचे दुकान आहे.

महागाव (यवतमाळ): महागाव येथील सोन्या-चांदीचे दागिने घडविणाऱ्या सराफा व्यवसायीकाचे किनवट तालुक्यातील मांडवी येथून अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना ६ जानेवारी रोजी घडली. दीपक हनुमंत जरे (२२) असे सराफा व्यवसायीकाचे नाव असून महागाव येथे त्यांचे दागिणे तयार करण्याचे दुकान आहे.

तयार केलेले सोन्या-चांदीचे दागिणे मांडवी येथील सराफा व्यावसायिकास नेऊन देत असतांना अज्ञात अपहरणकर्त्यांनी तवेरा या वाहनातून दीपक जरे याचे अपहरण करून शंभर ग्रॅम सोने, तीन किलो चांदी आणि पन्नास हजार रुपये रोख असा साडेचार लाखाचा ऐवज लुटला. केवळ योगायोगाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोलापूर नजीक सुटका करून घेतलेला सराफा व्यवसायिक दीपक जरे हा अपहरणकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाला असून तो तूर्तास पंढरपूर येथील दवाखान्यात भरती आहे.

प्राप्त माहितीनुसार, दीपक हनुमंत जरे यांचा महागाव शहरातील सराफा लाईन मध्ये दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. ऑर्डरचे दागिणे घेऊन ६ जानेवारी रोजी मोटरसायकल (एम. एच.२९-१५०२) द्वारे ते सारखणी येथे गेले. तिथे महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात दागिने दिल्यानंतर दुचाकी पंक्चर झाल्यामुळे अन्य वाहनाने ते मांडवी येथे गेले. मांडवी येथील साईश्रद्धा ज्वेलर्समध्ये ऑर्डरचे दागिने दिल्यानंतर एका ऑटोरिक्षाने ते सारखणी कडे निघाले. दोन कि.मी. अंतरावर टायर पंक्चर झाल्याची बतावणी करून ऑटोचालकांने वाहन थांबविले. यावेळी ऑटोमध्ये अन्य दोन प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, त्याचवेळी पाठीमागून लाल रंगाचे तवेरा हे वाहन तिथे येऊन थांबले. ऑटोरिक्षा आणि तवेरा वाहनातील पाच जणांनी दीपक जरे यास जबरदस्तीने उचलून तवेरा वाहनात घातले. जरे यास बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील साडेचार लाख रुपयांचा ऐवज अपहरणकर्त्यांनी हिसकावून घेतला.

तब्बल बारा तासांचा प्रवास केल्यानंतर अपहरणकर्ते सोलापूर शहरानजीक चहा घेण्यासाठी थांबले. या संधीचा फायदा घेत दीपक जरे यांनी तवेरा गाडीचा पाठीमागील काच फोडून गाडीतून पलायन केले. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत जरे यांच्या हाताला जबर दुखापतीमुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेले जरे यांनी अन्य वाहनाने थेट पंढरपूर गाठून शहर पो.स्टे.ला या घटनेची फिर्याद दिली. पंढरपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेऊन प्रकरण मांडवी पोलिसांकडे वर्ग केले आहे. सराफा व्यवसायिकाच्या अपहरणाच्या व दरोड्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून, मांडवी पोलिसांपुढे अपहरणकर्त्यांना अटक करण्याचे आव्हान आहे.

Web Title: yavatmal news Kidnapping of businessman In the complaint filed in Pandharpur